उद्यानातील लहान मुलांच्या खेळण्यांची प्रचंड दुरवस्था
महापालिकेच्या निगडी येथील दुर्गादेवी उद्यानातील लहान मुलांच्या खेळण्याची दुरवस्था झाली आहे. उद्यानामधील लहान मुलांची खेळणी व बसण्यासाठी असणारी काही बाकेही तुटली आहेत. ज्येष्ठ नागरिकांसह बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे.उद्यानातील पुरेशा देखभाली अभावी झाडे सुकू लागली आहेत. सर्वत्र गवत उगवले असून मैदानात झुडपे तयार झाली असून खेळणी तुटली आहेत.
त्याचप्रमाणे जागोजागी झाडांचा पालापाचोळा कचरा पसरला आहे. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या अबालवृध्दासह नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात उद्यानांची संख्या सर्वाधिक आहे. काही उद्याने सोडल्यास अनेक लहान-सहान उद्यानांकडे पालिका उद्यान विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. अनेक उद्यानांना अवकळा आली आहे. अशीच अवस्था निगडीतील दुर्गादेवी उद्यानाची झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच भागातून नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुल या उद्यानात सकाळी फिरण्यास येत असतात. हे उद्यान परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांच्या विरंगुळ्यास उपयुक्त ठरत आहे. सध्यस्थिती उद्यानात झालेली दुरवस्था पाहून नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
उद्यानातील लहान मुलांच्या खेळण्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. झोके नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे खेळण्यास येणाऱ्या लहान मुलांचा हिरमोड होत आहे. काही ठिकाणी मैदानावर गवत, झुडपे उगवले आहेत.उद्यानात जागोजागी झाडाचा पालापाचोळा कचरा पसरल्याचे दिसत आहे. उद्यानाची देखभाल दुरुस्ती करणा-या ठेकेदारांकडून कामे होताना दिसत नाहीत. उद्यानाची योग्य देखभाल दुरुस्ती होत नसल्याने दिसून येत आहे. त्यामुळेच नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
खेळणी तुटली, मुलांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता
दुर्गादेवी उद्यानात महापालिकेने बसवलेली सर्व खेळणी पुर्ण तुटलेली आहेत. तर लहान मुलांना खेळण्यासाठी बसवलेले काही साहित्य मोडकळीस आलेले आहे. उद्यानात लहान मुले-मुली खेळण्यास येतात. कुतूहलापोटी एखादे लहान मूल त्या खेळण्याच्या साहित्यावर पडल्यास त्याला इजा होऊ शकते. हाता-पायाला देखील जखमा होऊ शकतात. त्यामुळेच खेळण्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
दुर्गादेवी उद्यानाची दुरवस्था झाली आहे. सध्या शाळांच्या परिक्षा संपून दिवाळीची सुट्टी लागली आहे. दररोज लहान मुले उद्यानात खेळण्यास येत असतात. ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाणही लक्षणीय असते. पण, उद्यानातील तुटलेली खेळणी, अस्वच्छता, वाढलेले गवत आणि सुकलेली झाडे पाहून नागरिकासह लहान मुलांचा हिरमोड होतोय. त्यामुळे उद्यानातील खेळणी तात्काळ बदलण्यात यावे.
- सतीश कदम, सामाजिक कार्यकर्ता