Hinjawadi : कचरा जाळण्यावरून पेटले वातावरण

पिंपरी-चिंचवड शहरातील गजबजलेल्या तसेच टेक सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंजवडी येथे कचरा जाळण्याचे व्हीडीओ रेकॉर्डिंग करणाऱ्या एका स्थानिक नागरी कार्यकर्त्याला भयावह परिस्थितीला सामोरे जावे लागले.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

प्लास्टिकचा कचरा जाळणाऱ्याचा 'मॉर्निंग वॉक' करणाऱ्याने बनवला व्हीडीओ, संतापलेल्या नागरिकांनी केला हल्ला, हिंजवडीतील घटना

पिंपरी-चिंचवड शहरातील गजबजलेल्या तसेच टेक सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंजवडी येथे कचरा जाळण्याचे व्हीडीओ रेकॉर्डिंग करणाऱ्या एका स्थानिक नागरी कार्यकर्त्याला भयावह परिस्थितीला सामोरे जावे लागले. या घटनेचे रेकॉर्डिंग केले म्हणून स्थानिक नागरिकांनी सदर कार्यकर्त्यावर हल्ला केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

हिंजेवडीतील कचरा जाळण्याच्या घटनेवरून स्थानिक नागरी कार्यकर्ते चैतन्य केत यांना विरोधाचा सामना करावा लागला. केत यांनी सकाळी फेरफटका मारताना एका कर्मचाऱ्याला प्लास्टिक कचरा गोळा करून जाळताना पाहिले. त्यांनी या अवैध प्रकाराचे व्हीडीओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु या कृतीवरून अनपेक्षितपणे गंभीर तणाव निर्माण झाला.

ही घटना केवळ या परिसरात नेहमीच्या होऊन बसलेल्या गंभीर पर्यावरणीय समस्यांवरच प्रकाश टाकत   नाही तर नागरी जबाबदारीचे समर्थन करणाऱ्या व्यक्तींना भेडसावणारी आव्हानेदेखील यानिमित्ताने समोर आली आहेत.  

चैतन्य केत हे मॉर्निंग वॉक करत असताना एक माणूस प्लास्टिक कचरा गोळा करून त्याचा ढिगारा  जाळताना दिसला. ही घटना त्यांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये रेकॉर्ड करण्याचे ठरवले. नागरी कर्तव्याची जाणीव ठेऊन केलेल्या या साधारण वाटणाऱ्या या कृतीचे रुपांतर भयावह संघर्षात झाले.

केत यांनी सदर चित्रीकरण केल्यावर कचरा जाळणारा माणूस त्यांच्याकडे आला आणि त्याने केत यांच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली. त्या माणसाचे आक्रमक वर्तन पाहून केत यांना वातावरण चिघळू शकते, याचा अंदाज आला. हे पाहून त्यांनी परिसर सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी दोन स्थानिक नागरिकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, हे पाहून केत घाबरले. या घटनेबाबत ‘सीविक मिरर’कडे आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले, ‘‘मला त्यांची आक्रमक नजर आणि वर्तन पाहून असुरक्षित वाटायला लागले. आपण येथून लवकर निघालो नाही तर वातावरण चिघळू शकते, याची जाणीव मला झाली.’’

 आपली सुटका कशी करून घ्यावी, या विचारात असताना जवळूनच रिक्षा जात असल्याचे केत यांच्या लक्षात आले.  ड्रायव्हरला रिक्षा सुरू करण्यास सांगून त्यात उडी मारली. मात्र दोघेजण त्यांच्या मागे धावत आले आणि रिक्षा अडवली. केत कसेबसे रिक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी जवळच्या चौकाकडे धाव घेतली. तेथे गर्दी असूनही त्या दोघांनी केत यांचा पाठलाग केला. मात्र तेथे अनेक जण उपस्थित असल्याने मारामारीचा प्रसंग टळला.   

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केत यांनी ‘‘तुम्हाला काय हवे आहे,’’ असे  त्यांना विचारले. प्लास्टिक कचरा जाळणे बेकायदेशीर असल्याचे सांगितल्यावर ते याबाबत अनभिज्ञ असल्याचे केत यांना जाणवले. ‘‘येथे प्रत्येकजण कचरा जाळतो. तुम्ही पोलीस आहात काय,’’ असे उद्धटपणे विचारत त्या दोघांनी केत यांच्याकडे व्हीडीओ डिलिट करण्याची मागणी केली.  

तणाव निवळण्यासाठी केत यांनी त्यांच्यासमोरच व्हीडीओ डिलीट केला. त्यांना प्लास्टिक जाळण्याशी संबंधित धोके सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. पाठलाग करणारे दोघेजण निघून गेल्यावर  जो तो प्लास्टिक कचरा जाळण्यावरून झालेल्या भांडणाबाबत जाणून घेण्यास उत्सुक दिसत होता. या घटनेने केत यांना पोलिसांकडे तक्रार देण्याबाबत विचार करण्यास भाग पाडले.

केत यांनी व्हीडीओ डिलिट करून घटनास्थळ सोडले. ‘‘कचरा जाळण्याचे संभाव्य आरोग्यविषयक आणि पर्यावरणीय धोके या भागातील नागरिकांना ठाऊक नाहीत. अशा घटना पुन्हा होऊ नये, यासाठी जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. कचरा जाळणे हा गुन्हा आहे, याची जाणीव नागरिकांना नाही. मात्र, त्यांच्यापैकी काही चित्रीकरणाला गुन्हा मानतात,’’ असे त्यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.  

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी या घटनेची दखल घेत हिवाळ्यात कचरा जाळण्याचे प्रमाण वाढल्याचे मान्य केले. ‘‘हिवाळ्यात कचरा जाळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक नेमले आहे. आम्ही शहराच्या बाहेरील भागात जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत,’’ असे त्यांनी सांगितले.

या घटनेमुळे पुण्यातील पर्यावरण जागृतीबाबत व्यापक प्रश्न निर्माण झाले आहेत. हिंजवडीसारख्या शहरी भागात सतत कचरा जाळण्याच्या घटनेत वाढ होत आहे. कचऱ्याची विल्हेवाट अशी लावावी, याबाबत नागरिकांचे समुपदेशन गरजेचे आहे. रहिवाशांमध्ये नागरी उत्तरदायित्व आणि जागरुकतेची जाणीव वाढवून या समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी कृती करणे आवश्यक आहे.

हिवाळ्यात कचरा जाळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक नेमले आहे. आम्ही शहराच्या बाहेरील भागात जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- संदीप कदम, कचरा व्यवस्थापन विभागप्रमुख, पिंपरी-चिंचवड महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story