एकत्रितपणे दिवाळी फराळाचा मनमुराद आनंद घेतला
विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. या निवडणुकीत आखाड्यातून वेळ काढत पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक राजकारणात एकत्र येत सर्वपक्षीय दिवाळी फराळाचा मनमुराद आनंद घेतला. राजकारणात एकमेकांचे विरोधक आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांनी देखील गळाभेट घेतली.
खेळीमेळीच्या वातावरणात ही दिवाळी फराळ गप्पांची मैफल बनली होती. विधानसभा निवडणुकांचा सुरू असलेला रणसंग्राम, त्यात होणारे बेछूट आरोप-प्रत्यारोप, त्यामुळे तापलेले वातावरण, वर्षानुवर्षांचे हेवेदावे, कुरघोडीचे राजकारण हे सगळे बाजूला ठेवून राजकीय पक्षांचे दिग्गज नेते, आमदार, खासदार, विधानसभा निवडणुकीतील उमेदवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बुधवारी (दि.३०) एकत्रितपणे दिवाळी फराळाचा मनमुराद आनंद घेतला.
दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने वाकडमध्ये हॉटेल बर्ड व्हॅलीत झालेल्या या कार्यक्रमात खासदार श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार अमर साबळे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, माजी महापौर संजोग वाघेरे, दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे, नाट्यनिर्माते राहुल भंडारे, राज्य नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, पिंपरी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, शहराध्यक्ष शंकर जगताप, सचिन चिखले, माजी शहराध्यक्ष वसंत लोंढे, राहुल कलाटे, योगेश बाबर, सचिन साठे, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, शत्रुघ्न काटे, मयूर कलाटे, सुरेश भोईर, धनंजय काळभोर, तुषार हिंगे, बाळासाहेब मोरे, संतोष कांबळे, महेश कुलकर्णी, अमित बाबर, विशाल यादव, प्रेरणा बँकेचे अध्यक्ष कांतीलाल गुजर, सम्यक साबळे आदींनी हजेरी लावली.