पिंपरी-चिंचवड: महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराविरोधात रावणदहन
पिंपरी-चिंचवड: राज्यात महिल्यावर अन्याय, अत्याचार वाढले आहेत. महिला, मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडल्याने महिला, मुलींना न्याय मिळत नाही. त्यामुळे महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी बुधवारी रावण दहन आंदोलन करण्यात आले. दरम्यान, महिलांवर अत्याचार करणाऱ्यास कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली.
पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आज महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, महिला अध्यक्षा ज्योती निंबाळकर यांच्या नेतृत्वात महिलांवरील अन्याय, अत्याचाराच्या घटना वाढल्या असून राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करत तीन तोंडाच्या रावणाचे दहन करण्यात आले. यावेळी ज्योती निंबाळकर म्हणाल्या की, स्त्रियांवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. अनेक घटनाची पोलिसात नोंद होत नाही. वेगवेगळ्या कारणांनी अंधारात राहणाऱ्या घटनांची संख्या वाढत आहे. स्त्रियांवरील अन्याय/अत्याचार दूर करण्यासाठी प्रभावी कायदे आणि त्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे.
हे सरकार झोपा काढत असून जिल्ह्यात अत्याचाराच्या अनेक घटना पुढे येत आहेत. महिला आयोग महिला आयोग नसून खोक्यावर काम करणाऱ्या सरकारचे रिल्स आयोग झाले आहे. सगळे दिसत असूनही आयोगाने कान, डोळे आणि तोंडावर हात ठेवलेले आहेत. या आंदोलनात कामगार संघटनेचे प्रदेशचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, काशिनाथ जगताप, प्रियंका बारसे, विश्रांती पाडाळे, आशा भोसले, सारिका हरगुडे, कल्पना घाडगे, तायरा सय्यद, प्रिया देशमुख, कमरुनिसा शेख, कमल धाईंजे, राजश्री कारंडे, अनुसया वाडकर, मीना जाजोट, आशा सरडे, ज्योती येवले, पुष्पा जानराव, हसीना पटेल, कान्होपात्रा थोरात, स्नेहल दोगाडे, भवरी शिंदे, संगीता भोसले, प्रतीक्षा महानवर, अर्चना हजारे, मंदाकिनी भंगे, शकुंतला बालकुंदे, लता मकासरे, भारती नलावडे, अनिता भुरे, जयश्री झेंडे, कीर्ती तोरणे, महिमा जोंधळे या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.