पिंपरी-चिंचवड: अनधिकृत शाळांसमोर शिक्षण विभागाने लावले फलक

पिंपरी-चिंचवड: महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शहरातील ११ अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर पाच शाळा संबंधित शिक्षण विभागाने बंद केल्या आहेत, तर उरलेल्या शाळांनी महापालिका प्रशासनाने काढलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.

Pimpri Chinchwad, Pimpri Chinchwad School, PCMC, Education Department

संग्रहित छायाचित्र

पाच शाळा संबंधित शिक्षण प्रशासनाने केल्या बंद, पालकांना केले प्रवेश न घेण्याचे आवाहन, फौजदारी कारवाई करण्यास टाळाटाळ

पिंपरी-चिंचवड: महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शहरातील ११ अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर पाच शाळा संबंधित शिक्षण विभागाने बंद केल्या आहेत, तर उरलेल्या शाळांनी महापालिका प्रशासनाने काढलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे महापालिकेच्या शिक्षण विभागाने त्या शाळांसमोर फलक लावण्याची कारवाई केली आहे. याद्वारे पालकांना या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, या शाळांवर फौजदारी कारवाई करण्याकडे डोळेझाक केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागाने मे महिन्यामध्ये ११ शाळा अनधिकृत यादी जाहीर केली होती. त्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यात येऊ नये, असेही जाहीर केले होते. त्यानंतर या शाळा बंद करण्याबाबत शिक्षण विभागाने वारंवार पत्रव्यवहार केला. शासन मान्यता नसताना देखील शाळा सुरू ठेवणाऱ्या शाळांच्या दर्शनी भागात शिक्षण विभागाकडून सोमवारी (दि. १) पाहणी करण्यात आली. कासारवाडी येथील माउंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या शाळेच्या प्रवेशद्वारावर फलक लावण्यात आला आहे. याशिवाय पीपल ट्री एज्युकेशन ट्रस्ट, गांधीनगर पिंपळे निलख, श्री चैतन्य इंग्लिश मीडियम स्कूल, पिंपळे निलख, लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, चिंचवडेनगर, नवजित विद्यालय, लक्ष्मीनगर वाल्हेकरवाडी व ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड या शाळांच्या प्रवेशद्वारावर फलक लावण्यात आले आहेत.

या सर्व शाळा अनधिकृत असून या शाळेत पालकांनी इयत्ता पहिलीपासून पुढे आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये. सदर शाळेला शासनाकडून कोणत्याही प्रकारची मान्यता नसल्याने ही शाळा आमच्या (शिक्षण विभाग) कार्यालयाने शाळा अनधिकृत घोषित केली आहे. तसेच शाळा बंद केली आहे. या शाळेत आपल्या पाल्यास प्रवेश घेतल्यास होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस आपणच जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी, असा मजकूर देण्यात आला आहे.

या शाळा केल्या बंद
महापालिका शिक्षण विभागाकडून शासन मान्यता नसलेल्या आयडीएस इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळे गुरव, सपलिंग्स इंग्लिश मीडियम स्कूल मोशी, किडसजी स्कूल पिंपळे सौदागर, एस. एस. स्कूल फॉर किड्स सांगवी व क्रिस्टल मॉर्डन स्कूल, वडमुखवाडी या शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

शहरामध्ये ११ शाळा अनधिकृत होत्या. त्यापैकी पाच शाळा संबंधित प्रशासनाने स्वत: बंद केल्या आहेत. बाकीच्यांना आपण शाळा बंद करण्याबाबत मुदत दिली होती. मात्र, त्यांनी बंद न केल्याने आपण शाळांसमोर फलक लावले आहेत. आताही या शाळा सुरू राहिल्या तर पुढील आठवड्यात या शाळांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
- संगीता बांगर - घोडेकर,  प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग. महापालिका

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest