नाटकांमुळे आनंद अन् समाधान मिळते: ख्यातनाम अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांचे प्रतिपादन
नाटकाशी माझी नाळ जोडलेली आहे. आपण जे नाटक पाहतो, त्यात खूप आनंद आणि समाधान मिळून जाते. कलागौरव पुरस्कार मिळालेल्या दोघांनी रसिकांना भरभरून हसवले, असे प्रतिपादन अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांनी केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेच्या वतीने गोळवलकर मैदान येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 'कलागौरव' पुरस्कार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम विशाखा सुभेदार व पंढरी कांबळे यांना अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार सुनील शेळके, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष जनार्धन रणदिवे, नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद तळेगाव शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे उपस्थित होते.
दरम्यान, नाट्य परिषदेचे सल्लागार चंद्रकांत भिडे यांना अमृत महोत्सवानिमित्त जीवनगौरव पुरस्कार, तर नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष नितीन शहा व नाट्य परिषदेचे आधारस्तंभ ज्येष्ठ रंगकर्मी अभय लिमये यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी, मधुसूदन ओझा प्रस्तुत रजनीगंधा हा हिंदी-मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. पुरस्काराला उत्तर देताना पंढरीनाथ कांबळे म्हणाले की, या संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या पुरस्कारामुळे मोठी जबाबदारी वाढली आहे. तर विशाखा सुभेदार यांनी सांगितले, नाट्य परिषद हे माझे माहेर आहे. उतारवयामध्ये कलाकारांना साथ द्याल, ही अपेक्षा असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी, सूत्रसंचालन डॉ. विनया केसकर यांनी, तर आभार प्रसाद मुंगे यांनी मानले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.