Pimpri Chinchwad: शहरातील उपनगरांत दूषित पाणीपुरवठा

गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील उपनगरात मोठ्या प्रमाणात दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्या पाण्याला दुर्गंधीदेखील येत आहे. यामुळेच, तेथील नागरिकांना घशाचे आजार होऊ लागले आहेत.

PCMC

Pimpri Chinchwad: शहरातील उपनगरांत दूषित पाणीपुरवठा

पाणीटंचाई अन् दूषित पाणी या कात्रीत अडकले नागरिक, महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून केवळ पोकळ आश्वासन

गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील उपनगरात मोठ्या प्रमाणात दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्या पाण्याला दुर्गंधीदेखील येत आहे. यामुळेच, तेथील नागरिकांना घशाचे आजार होऊ लागले आहेत. आधीच पाणीकपातीचे संकट येणार असून, दुसरीकडे दूषित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे नागरिक दोन्ही बाजूंनी कात्रीत सापडले आहेत.

मोशी, चिखली, काळेवाडी, थेरगाव, आकुर्डी परिसरातील गावठाण, विविध सोसायट्या, वाड्या-वस्त्यांना महापालिकेकडून पिण्याचे अशुद्ध पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. त्याचप्रमाणे पाण्याचा दाबही कमी झाला आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढत असताना आठवड्यातून एकदा पाणी सोडण्यात येत असून, दुसरीकडे हे पाणीही दूषित झाले आहे. दूषित पाणीपुरवठा होत आहे. परिणामी नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.

सोसायटीतील नागरिकांकडे घरात वॉटर फिल्टर/ प्युरिफायर आहेत. मात्र, तरीदेखील या पाण्याचा रंग, वास आणि चव बदलली आहे. प्युरिफायरच्या फिल्टरमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठला जात आहे. मोशी, बोराटे वस्ती ते टोलनाक्यापर्यंत सर्वांना अशाच प्रकारचा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे, नागरिकांना नाईलाजास्तव बाटली बंद पाणी विकत घ्यावे लागत आहे. तोच प्रकार बहुतांश परिसरात पाहण्यास मिळतो. अनेकदा महापालिकेकडे तक्रार करूनही त्यावर अपेक्षित कार्यवाही होताना दिसत नाही.

पूर्वी मोशी परिसरातील नागरिकांना पवना धरणातून स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. आता मात्र नक्की कोणत्या नदीतून पाणीपुरवठा केला जातो आहे, असा प्रश्न येथील नागरिक करत आहेत. चिखली, मोशी परिसरात सर्वसामान्य नागरिक वास्तव्यास आहेत. बहुतांश कामगार वर्ग येथे भाड्याने खोली करून आपला उदरनिर्वाह करत असतो. त्यांना हेच दूषित पाणी वापरावे लागत आहे. हाच प्रकार काळेवाडीत असून, थेरगाव व वाकड परिसरातही अधूनमधून दूषित पाणीपुरवठा होत असतो. महापालिकेचे अधिकारी पाहणी करून केवळ आश्वासन देतात. या ठिकाणी नव्या जलवाहिनी बसवण्यात आल्या आहेत. उलट यामुळे पाणी समस्या अधिक भेडसावत आहे.

चिखली येथील रामदासनगर, गणेशनगर, सोनवणेवस्ती आणि पाटीलनगर परिसरात मागील काही दिवसांपासून ठिकठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागात अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित विभागाने येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या सोसायटीमध्ये चव आणि रंग बदललेले दूषित पाणी येत आहे. या पाण्यामुळे घशात घवघव होणे यासारख्या तक्रारी जाणवत आहेत.

- मच्छिंद्र गेंगजे, सोसायटी, रहिवासी

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest