संग्रहित छायाचित्र
(पंकज खोले)
पिंपरी चिंचवड: हिंजवडी परिसरातील सोसायटीत पिण्याच्या पाण्यात अळी सापडल्याची घटना ताजी असताना, थेरगाव-वाकड परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. गेल्या आठवडाभरापासून वाकड रस्त्यावरील एकता कॉलनी, गणेश कॉलनी, मंगलनगर या भागात नागरिकांना ही समस्या भेडसावत आहे. परिणामी, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Latest News Pimpri Chinchwad)
पिंपरी-चिंचवड परिसरात महापालिकेच्या वतीने दिवसाआड पाणी देण्यात येते. परिणामी, पाण्याचा अपुरा व कमी दाब जाणवतो. थेरगाव, वाकड या परिसरात नुकतीच जलवाहिनी बदलण्यासाठी करोडो रुपये खर्च केले आहेत. मात्र अद्याप पाण्याच्या तक्रारी कमी झाल्या नाहीत. त्यातच आता दुर्गंधीयुक्त व दूषित पाणी येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गणेशनगर, एकता कॉलनी या परिसरात नळावाटे दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी महापालिकेच्या विभागात केल्या आहेत, तर काही ठिकाणी पाण्यातून गाळ येत असल्याच्या तक्रारीसुद्धा आहेत. (Wakad Water Issue)
हिंजवडी येथील एका सोसायटीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या वॉटर फिल्टरमध्ये लाल रंगाच्या अळ्या आढळून आल्या. ही घटना ताजी असतानाच त्यानजीकच असलेल्या वाकड परिसरात गढूळ पाणी पुरवठा होत आहे. दिवसाआड पाणी सोडत असल्याने नाईलाजास्तव तेच पाणी वापरावे लागत असल्याचे येथील नागरिक सांगतात. येथील गल्ली क्रमांक ६ या ठिकाणी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागास कळवूनही तेथे कोणी आले नाही, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली. ते मदतीची अपेक्षा करीत असून, तक्रारी करूनही दुर्लक्ष करण्यात येते. त्याचा त्रास नागरिकांना होत असून विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.
रहाटणीतील गुरुकुल कॉलनीत तक्रारी
रहाटणी येथील गुरुकुल कॉलनीतही पाण्याच्या तक्रारी नागरिकांनी महापालिकडे केल्या आहेत. या ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, महापालिकेचे संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे येथील पाण्याच्या तक्रारीवर तोडगा काढावयासाठी यासाठी महापालिकेचे अभियंता अजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी केली होती. दरम्यान, याबाबत कार्यकारी अभियंता अजय सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही, तर कनिष्ठ अभियंता प्रीती कासार यांनी थेरगाव परिसरातील तक्रारीबाबत अडचण दूर होईल, असे सांगितले.
पाण्याच्या प्रेशरच्या असंख्य तक्रारी
वाकड रस्त्यावरील मंगलनगर येथील भागात नुकतीच जलवाहिनी बदलण्यात आली. जुनी मोठ्या व्यासाची जलवाहिनी बंद करून तुलनेने छोटे पाईप टाकण्यात आले. यास नागरिकांनी विरोध केल्यानंतर यामुळे पाण्याचा प्रेशर वाढेल असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात यामुळे पाण्याचा प्रेशर आणखी कमी झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार करूनही एकही अधिकारी तेथे फिरकला नाही.
विकतच्या पाण्याचा भुर्दंड
नळावाटे अशाप्रकारे दूषित पाणी येत असल्याने रहिवाशांना विकतचे पाणी आणावे लागत आहे. महिनाकाठी ४०० ते ५०० रुपये खर्च करावे लागत आहेत, तर नळाला रुमाल अथवा कापड लावून पाणी गाळून घावे लागत आहे.
नविन जल वहिनी जिथे संपते तेथे गाळ साचतो. याची तक्रार केल्यानंतर महापालिकाचे संबंधित अधिकारी तात्पुरते फ्लश करुन घेतात, पण त्या ठिकाणी महिन्यातून एकदा फ्लश करणे गरजेचे आहे. ते दूषित पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष द्यावे, अन्यथा याविरोधात जनआंदोलन उभारावे लागेल. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने महापालिकेने त्याची त्वरित दखल घ्यावी— अनिकेत प्रभू, थेरगाव सोशल फाउंडेशन
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.