संग्रहित छायाचित्र
पिंपरी चिंचवड: कुदळवाडी येथील मोरे-पाटील चौकात एका कंपनीला लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात रासायनिक पावडर जळाल्याने विषारी धूर तयार झाला. परिसराबरोबर एक ते दीड किलोमीटरमधील नागरिकांना श्वसनाचा त्रास झाला. तसेच नाका-डोळ्यांची आगी होऊन नागरिक हैराण झाले होते. फोमचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवले. शनिवारी (दि. १७) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. एक तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. (Pimpri Chinchwad News)
येथील एच आय एंटरप्राईजेस कंपनी, मोरे पाटील चौक, रहमानी वजन काट्याजवळ आग लागल्याची माहिती शनिवारी सायंकाळी अग्निशमन दलास मिळाली. कमरुद्दिन रहमानी यांनी ही माहिती दिली. त्यानुसार या ठिकाणी पिंपरी ६, आणि भोसरी १, मोशी १, तळवडे १, चिखली १ अशी १० अग्निशमन वाहने तत्काळ पाठविण्यात आली.
घटनास्थळी आगीमध्ये जळणारे मटेरियल ॲल्युमिनियम मेटल पावडर व अन्य रासायनिक पावडर असल्याने पाण्याचा उपयोग होत नव्हता. त्यातच आगीतून निर्माण होणाऱ्या विषारी धुरामुळे जवानांना अडचण येत होती. पाण्याचा वापर करून नियंत्रण होत नसल्याने फोमचा वापर करावा लागला. २ ते ३ ट्रॅकटरमध्ये रेती आणून आगीवर रेती पसरून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. आगीवर अखेर नियंत्रण मिळविले. यावेळी कोणतीही जीवितहानी सुदैवाने झालेली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. आगीच्या विषारी धुरामुळे परिसरातील सर्व लोकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच नाका-डोळ्यांची आग होऊन पाणी येत होते.
याबाबत माहिती देताना अग्निशमन विभागाचे अधिकारी वरद नाले यांनी सांगितले की, आगीची माहिती मिळाल्यावर आम्ही येथे आल्यावर घटनेचे गांभीर्य लक्षात आले. आल्यानंतर ॲल्युमिनियम पावडरला आग लागल्याचे लक्षात आले. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यास थोडा उशीर झाला. तसेच, गर्दीमुळे या ठिकाणी पोहोचण्यास वेळ लागला. या घटनेत कोणीही जखमी झालेला नाही. उप अग्निशमन अधिकारी उदय वानखडे, विनायक नाळे, सुनील फरांदे, ऋषिकांत चिपाडे, अनिल डिंबळे, दिलीप गायकवाड तसेच २५ ते ३० अग्निशमन कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी सहकार्य केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.