पिंपरी-चिंचवड: महापालिकेच्या विविध योजनांचा लाभ घ्या; साहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांचे आवाहन

शालेय आणि उच्चशिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने विविध योजना राबवण्यात येतात. विविध मागासवर्गीय कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज सादर करावेत

संग्रहित छायाचित्र

लाभार्थ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत संकेतस्थळावर करावा लागणार अर्ज

शालेय आणि उच्चशिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने विविध योजना राबवण्यात येतात. विविध मागासवर्गीय कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज सादर करावेत, असे आवाहन साहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभागाच्या वतीने महिला व बालकल्याण योजना, दिव्यांग व कल्याणकारी योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना तसेच इतर कल्याणकारी योजना राबवण्यात येतात. त्यापैकी मागासवर्गीय कल्याणकारी योजनेमध्ये माता रमाई आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महर्षी वाल्मिकी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या योजनांचा समावेश आहे. माता रमाई आंबेडकर योजनेअंतर्गत इयत्ता ५ वी ते १० वी या वर्गात शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यानुसार इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ४ हजार रुपये तर ८ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये देण्यात येणार आहेत.

महर्षी वाल्मिकी योजनेअंतर्गत इयत्ता ८ वी ते १० वी वर्गात शिकत असलेल्या मागासवर्गीय मुला-मुलींना सायकल घेण्यासाठी एकदाच ७ हजार रुपये अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी मागासवर्गीय युवक-युवतींना प्रथम वर्षासाठी एकदाच १ लाख ५० हजार रुपये अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त मागासवर्गीय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संगणक प्रशिक्षण घेणाऱ्या लाभार्थीस प्रशिक्षण फी मध्ये ९० टक्के सवलत देण्यात येणार असून यासोबतच महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) मार्फत एम.के.सी.एल अंतर्गत एमएस-सीआयटी, डी.टी.पी, टॅली आणि के.एल.आय.सी. या संगणक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

या सर्व योजनांची सविस्तर माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in अधिकृत संकेतस्थळावरील समाज विकास विभाग या पर्यायावर उपलब्ध असून अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, अटी शर्ती, लाभाच्या स्वरूपाची माहिती ही संकेतस्थळावर देण्यात आली आहे. तरी शहरातील जास्तीत जास्त लाभार्थींनी दिलेल्या मुदतीत वेळेत अर्ज करून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

उच्च शिक्षणास मिळणार अर्थसाहाय्य

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत १२ वी नंतरचे वैद्यकीय अभ्यासक्रम (एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस, बीयूएमएस, बीएचएमएस), अभियांत्रिकी पदवी बी.आर्क, बी.पी.टी.एच, बी.फार्म, बी.व्ही.एस.सी, आभियांत्रिकी ए.एन.एम, जी.एन.एम आणि बी.एस्सी नर्सिंग पदवीसारखे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षी एकदाच २५ हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest