संग्रहित छायाचित्र
महापलिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर इतिहासात पहिल्यांदाच महापालिकेच्या वतीने मतदारांना पिण्यासाठी सुमारे ५ लाख पाणी बॉटल्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय सुमारे ३०० सुरक्षारक्षक कर्मचारी, २५० महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, १५ हरित मतदान केंद्र, आपत्कालीन विद्युत व्यवस्था, मतदान केंद्रांवर व्यवस्थेसह सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शहरातील पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश पुण्याचे निवडणूक निरीक्षक यांनी महापालिकेला दिल्या आहेत. त्यानुसार प्रशासकीय भवनात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी प्रशासनाला निर्देश दिले. यावेळी पिंपरी-चिंचवड पोलीस वाहतूक शाखेचे उपायुक्त बापू बांगर, मुख्य अभियंता मकरंद निकम यांच्यासह कार्यकारी अभियंता, संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात एकाच इमारतीमध्ये ८ पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या सुमारे २७ ठिकाणी मतदारांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नोडल अधिकाऱ्यांनी संबंधित मतदान केंद्रांवर उपस्थित सर्व यंत्रणांशी समन्वय ठेऊन सोपवण्यात आलेले कामकाज करावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी बैठकीत दिले. यामध्ये ८ पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेले चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण ११ ठिकाणे आहेत, पिंपरी विधानसभा मतदारसंघात एकूण ४ ठिकाणे तर भोसरी विधानसभा मतदारसंघात एकूण १२ ठिकाणे असून महापलिकेच्या वतीने शहरातील सर्व मतदान केंद्रांवर विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी सांगितले. पिंपरी, भोसरी, चिंचवड मतदारसंघातील सर्व मतदार केंद्रांवर मतदारांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या मतदारांना महापालिकेच्या वतीने सुमारे ५ लाख पाणी बॉटल्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
महापलिकेच्या वतीने सर्व मतदार केंद्रांवर एकूण ३०० सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार असून महाराष्ट्र सुरक्षा दलाचे सुमारे २५० जवान तैनात करण्यात येणार आहेत. यासोबतच महाराष्ट्र पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी देखील मतदान केंद्रांवर उपस्थित राहणार आहेत. शहरातील विविध महाविद्यालयातील एनसीसी स्वयंसेवक आवश्यकतेनुसार मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे २७० एनसीसी स्वयंसेवक महापालिकेच्या वतीने नियुक्त करण्यात येणार आहेत. मतदान केंद्रावरील उपलब्ध सोयी सुविधांबाबत मतदारांना स्पष्ट बोध होण्यासाठी स्थळदर्शक व दिशादर्शक फलक लावण्यात येणार असून एकाच ठिकाणी जास्त मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी मतदारांना आपल्या मतदान केंद्राचे स्पष्ट बोध होण्यासाठी 'कलर कोडिंग' करण्यात येणार आहे.
आपत्कालीन विद्युत व्यवस्था
सर्व मतदान केंद्रांवर विद्युत व्यवस्था करण्यात आली असून आपत्कालीन परिस्थितीत विद्युत जनरेटरची सोय देखील करण्यात येणार आहे. त्याबाबत सर्व मतदान केंद्रांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. शहरातील मतदार केंद्रांवर स्वच्छता करण्यासाठी अतिरिक्त सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात येणार असून मतदान केंद्राचा परिसर, स्वच्छतागृहे वेळोवेळी स्वच्छ करण्याबाबतच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
पार्किंगची व्यवस्था
सर्व मतदार केंद्रांवर महापालिका आणि वाहतूक शाखा यांच्या समन्वयाने भव्य पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार असून मतदार नागरिकांच्या गाड्या पार्किंग करण्यासाठी मार्गदर्शक फलकदेखील लावण्यात येणार आहेत.
मतदान केंद्रांवर मंडप व बैठक व्यवस्था
शहरातील सर्व मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या मतदारांना बसण्याची व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात येणार असून त्यासाठी बेंच आणि खुर्च्यांची व्यवस्था महापालिकेच्या वतीने सर्व मतदान केंद्रांवर करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक ठिकाणी मंडप व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. पिंपरी, भोसरी आणि चिंचवड अशा तिन्ही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी ५ असे एकूण १५ हरित मतदार केंद्र स्थापित करण्यात येणार असून या ठिकाणी मतदारांना विविध वनस्पती माहितीसह ठेवण्यात येणार असून पर्यावरणपूरक संसाधने याबाबत माहिती देणारे आकर्षक सचित्रफलक लावण्यात येणार आहेत.
मतदान केंद्राच्या ठिकाणी किमान सुविधा उपलब्ध करून देताना कोणतीही कमतरता राहणार नाही याची सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी तसेच सर्व यंत्रणांशी समन्वय ठेवून कामकाज पार पाडावे.
- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.