संग्रहित छायाचित्र
(विकास शिंदे)
पिंपरी-चिंचवड: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून (२१ फेब्रुवारी) सुरू होत आहे. सकाळी अकरा ते दोन या वेळेत इंग्रजी विषयाचा पहिला पेपर आहे. या वर्षी पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातून २१ हजार ५०० परीक्षार्थी आहेत. यासाठी ३३ केंद्रांवर बोर्डाकडून तयारी पूर्ण झाली असल्याचे केंद्र चालकांकडून सांगण्यात आले. ही परीक्षा १९ मार्चपर्यंत आहे. विद्यार्थ्यांनी पेपरच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी केले. (Board Exam News)
पिंपरी-चिंचवड शहरासाठी दोन कस्टडी केंद्र दिले आहे. श्री म्हाळसाकांत माध्यमिक विद्यालय कस्टडीअंतर्गत १३ उपकेंद्र तर डॉ. डी. वाय. पाटील आर्ट, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय कस्टडीमध्ये २० उपकेंद्र आहे. दरम्यान, आजपासून मुख्य परीक्षेला सुरुवात होत असल्याने सर्व परीक्षा केंद्र सज्ज झालेले आहेत. परीक्षेच्या आदल्या दिवशी ठिकठिकाणच्या दुपारनंतर परीक्षा केंद्रांवर बैठक क्रमांक लिहिण्याचे काम सुरू होते. प्रत्येक वर्गखोल्यांवर क्रमांक टाकले. परीक्षेसंबंधी माहितीपर फलकलेखन केले.
बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था बोर्डाकडून दोन दिवसांपूर्वी जाहीर केली आहे. संबंधित महाविद्यालयात याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली जात आहेच. शिवाय, प्रत्येक विषयानुसार केंद्र कार्यरत आहेत. या वर्षी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात आली आहे. परीक्षा केंद्राजवळील १०० मीटर अंतरावर झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याबाबत सूचना केल्या आहेत. विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेल्यास त्यावर फौजदारी गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. प्रत्येक भरारीपथकाची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित केंद्रप्रमुखांशी संपर्क साधावा, असे आवाहन केंद्रचालकांनी केले आहे.
कॉपीमुक्त अभियान
कॉपीमुक्त अभियानासाठी परीक्षा मंडळाने पिंपरी विभागासाठी एकूण ३ भरारी पथके नेमली आहेत. परीक्षा केंद्रांवर शांततेत प्रवेश करण्याच्या सूचना भरारी पथकांना देण्यात आल्या असून, कॉपीमुक्त अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन शिक्षण विभागाच्या प्रशासनाने केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.