PCMC News : प्रशासकीय राजवटीत पिंपरीवर झाला अन्याय

महापालिकेच्या माध्यमातून प्रशासकीय राजवटीत शहरात तब्बल तीन हजार कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. या कामात शहरातील विकास कामाचा असमतोल साधला गेला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 29 Nov 2024
  • 05:10 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

महापालिकेकडून तब्बल तीन हजार कोटीची विकासकामे, सर्वांत कमी पिंपरीत तर भोसरीत सर्वाधिक कामावर निधी खर्च

महापालिकेच्या माध्यमातून प्रशासकीय राजवटीत शहरात तब्बल तीन हजार कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. या कामात शहरातील विकास कामाचा असमतोल साधला गेला आहे. सर्वांत जास्त कामे चिंचवडमध्ये, तर सर्वांत कमी कामे पिंपरीत झाली आहेत. मात्र, सर्वाधिक खर्चाची कामे भोसरी विधानसभा मतदारसंघात झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. या कालावधीत महापालिका हद्दीत विविध विकास कामांवर पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांत २,९३४ कोटी १३ लाख ९४ हजार ४३२ रुपये खर्च केले आहेत.

महापालिकेतील राजकीय पदाधिकाऱ्यांचा कालावधी १२ मार्च २०२२ ला संपुष्टात आल्यानंतर प्रशासकीय कालावधी सुरू झाला. प्रशासकीय राजवटीतील तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी फक्त देखरेख व नियोजित कामेच सुरू ठेवली होती. मात्र, त्यांच्या जागी आलेल्या आयुक्त शेखर सिंह यांनी शहरातील मोठ्या प्रकल्पांना हिरवा कंदील देत कोट्यवधी रुपयांची निविदा काढल्या. त्यामुळे शहरात तब्बल तीन हजार कोटीची निधी खर्च होत आहे.

दरम्यान, शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील एकत्रित कामांवर महापालिकेने ६३ कोटी १६ लाख ६६ हजार १५४ रुपये खर्च केले आहेत. क्रीडा आणि उद्यानविषयक कामांमध्ये ११३ कोटी २५ लाख १ हजार ७३६ रुपये खर्च झाले आहेत.

निविदांची कोटीच्या कोटी उड्डाणे
महापालिकेकडून नदी सुधार योजनेत मुळा नदीच्या पहिल्या टप्प्यासाठी ३२१ कोटींची निविदा काढण्यात आली. चिंचवडच्या ऑटो क्लस्टरसमोर १८ मजली प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी २८६ कोटी, शहरातील १८ मीटरपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते यांत्रिक पद्धतीने साफसफाईसाठी ६४७ कोटींची, तर भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्यासाठी जॅकेवल व पंपिंग स्टेशन बांधण्यासाठी १५१ कोटींची निविदा काढण्यात आली. अर्बन स्ट्रीटच्या कामालाही परवानगी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळातही मोठ्या खर्चांच्या निविदा काढण्यात आल्या.

विधानसभा मतदारसंघानुसार केलेली कामे (स्थापत्य) [कंसात निविदांची संख्या]

भोसरी [३८७]- १२२८ कोटी ८३ लाख ९१ हजार १५९

चिंचवड [४४२] - ६५४ कोटी ३९ लाख ९९ हजार १०

पिंपरी [३३१] - ८९७ कोटी १० लाख ७६ हजार ४७

एकत्रित [१७] -  ४० कोटी ८४ लाख २६ हजार ४८०

एकूण [११७७] - २८२० कोटी ८८ लाख ९२ हजार ६९६ 

विधानसभा मतदारसंघानुसार केलेली कामे (उद्यान व क्रीडा)

भोसरी [५६] - २८ कोटी ६३ लाख ५४ हजार २७२

चिंचवड [६१] - ४५ कोटी ४२ लाख ७ हजार ७१२

पिंपरी [३०] - १६ कोटी ८७ लाख ७८

एकत्रित [५] - २२ कोटी ३२ लाख ३९ हजार ६७४

एकूण [१५२] - ११३ कोटी २५ लाख १ हजार ७३६

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest