Pimpri Chinchwad News: उघड्यावरील औद्योगिक कचऱ्याला आग

पिंपरी-चिंचवड: उघड्यावर रचून ठेवलेल्या रबर, ड्रम अशा भंगार गोदामाला बुधवारी भीषण आग लागली. मोरवाडी येथील लालटोपी नगर परिसरात दुपारी १२ च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

Pimpri Chinchwad Fire

उघड्यावरील औद्योगिक कचऱ्याला आग

लालटोपी नगर परिसरातील रहिवासी रस्त्यावर, ऑटो क्लस्टर, मोरवाडीमध्ये पसरले धुराचे लोट, लाखो रुपयांचे झाले नुकसान

(पंकज खोले)
पिंपरी-चिंचवड: उघड्यावर रचून ठेवलेल्या रबर, ड्रम अशा भंगार गोदामाला बुधवारी भीषण आग लागली. मोरवाडी येथील लालटोपी नगर (Lal Topi Nagar) परिसरात दुपारी १२ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. सायंकाळी उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन विभागाचे काम सुरू होते. जवळपास एक ते दीड एकर परिसरात हा औद्योगिक कचरा पसरलेला होता.

पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या (Pimpri Chinchwad Court) जुन्या इमारतीमागील मोकळ्या जागेवर ४ ते ५ भंगार व्यावसायिकांचे साहित्य पडले आहे. शेख नावाचे कुटुंब या ठिकाणी भंगार व्यवसाय चालवते. वीटभट्टी अथवा कंपनीमध्ये ते स्क्रॅप जाळण्यासाठी घेतले जाते. बुधवारी सकाळी या ठिकाणी एका पोत्याला किरकोळ आग लागली. त्यामुळे तेथेच एका पत्र्याचे शेडमध्ये असलेल्या दोघांनी त्यावर पाणी मारले. मात्र, आग क्षणात पेटली. भंगार गोदामामध्ये रबर, प्लास्टिक असल्याने आग वाढत गेली. (Pimpri Chinchwad Fire News)

दरम्यान याची माहिती मिळतात स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दल व महापालिकेशी संपर्क साधला. गोदामाजवळ लोकवस्ती असल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीसाची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. भंगार गोदामचालक आरिफ शेख व  नजमुन शेख यांनी माहिती दिली की, शहरातून वेगवेगळ्या ठिकाणी गोळा केलेले औद्योगिक कचरा,  रबर या ठिकाणी ठेवण्यात आले होते. ते सर्व शहरातील कंपनी चालक घेऊन जात असतात. गुरुवारी त्यातील काही स्क्रॅप घेण्यासाठी वाहन येणार होते. मात्र त्या आधीच या ठिकाणी ठेवलेले भंगार जळून खाक झाले. या जवळपास लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगून शेख यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.

या आगीची माहिती मिळाल्यानंतर मुख्य अग्निशमन विभागाच्या दहा बंब, टाटा कंपनी आणि एमआयडीसी विभागाकडून आणखी मदत मागवण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विवेक मुगळीकर यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. महापालिकेचा आरोग्य, पर्यावरण विभाग आणि महावितरणचे अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झाले

नाल्यामुळे आग नियंत्रणात

उघड्यावरील गोदाम आणि लोकवस्ती या दरम्यान एक छोटासा नाला आहे. त्यामुळे गोदाम आणि लोकवस्ती यात चार ते पाच फुटाचे अंतर होते. या नाल्यामुळे आग लोक वस्तीमध्ये शिरली नाही. तसेच, आग आटोक्यात आणण्यास लवकर यश आले.आगीची भीषणता पाहता शेजारी असलेल्या फॅब्रिकेशन, मोल्डिंग या कंपनीच्या चालकांनी रस्त्यावर धाव घेतली. पोलीस व अग्निशमन दलास या आगीवर लवकर नियंत्रण करण्याची विनंती केली. या आगीमुळे आपल्या कंपनीचे नुकसान होईल या भीतीपोटी त्याची खटाटोप सुरू होती. या आगीमध्ये रबर मोठ्या प्रमाणात जळाल्याने धूराचे काळे लोट निर्माण झाले होते. हा धूर परिसरात दोन ते अडीच किलोमीटर पसरला होता. यामुळे बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. तसेच, या ठिकाणी फटाक्यासारखा आवाज येत, ड्रम उडून रस्त्यावर आले होते.

अन् वीज पुरवठा केला खंडित

भंगार गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या ठिकाणी उच्च दाब वाहिनी होत्या. तसेच आसपास लोकवस्ती असल्याने त्याची दक्षता घेऊन महावितरण कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी तातडीने या परिसरातील वीज पुरवठा खंडित केला. तसेच, या ठिकाणाची पाहणी करून एक कर्मचारी येथे नेमण्यात आला.

आयुक्त बंगला हाकेच्या अंतरावर

आगीची घटना घडली या ठिकाणाहून आयुक्त बंगला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. प्रत्यक्षात बारा वाजता लागलेली आगीची माहिती कळवूनही उशिरा महापालिकेची मदत मिळाली. शेजारी असलेल्या लोकवस्तीतील नागरिक भीतीमुळे बाहेर आले होते..त्यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest