संग्रहित छायाचित्र
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक १२ आणि पेठ क्रमांक ३०-३२ येथे सर्वांसाठी परवडणारी घरे योजनेंतर्गत सदनिकांच्या लॉटरीचा शुभारंभ करण्यात आला होता. या लॉटरीला तब्बल दोन वेळा मुदतवाढ दिल्याने प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत २ हजार ८६४ नागरिकांनी अनामत रक्कम जमा केली आहे. नागरिकांना पीएमआरडीएच्या सदनिकांसाठी आणखी दोन दिवस म्हणजेच १५ डिसेंबर २०२४ पर्यंतच अर्ज करता येणार आहे.
पीएमआरडीच्या पेठ क्रमांक १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ईडब्ल्यूएस (१ बीएचके) प्रवर्गातील ४७ सदनिका व एलआयजी (२ बीएचके) प्रवर्गातील ६१४ सदनिकांची लॉटरी काढण्यात येणार आहे. यासह पेठ क्रमांक ३०-३२ येथे ईडब्ल्यूएस (१ आरके) प्रवर्गात ३४७ तसेच एलआयजी (१ बीएचके) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १ हजार ३३७ शिल्लक असलेल्या सदनिकांच्या लॉटरी काढण्यात येणार आहे. यासाठी १२ ऑक्टोबरपासून अर्ज मागविण्यात येत आहे. यात शुक्रवार, १३ डिसेंबर दुपारपर्यंत २ हजार ८६४ जणांनी अनामत रक्कम भरली आहे. या सदनिकांसाठी रविवार, १५ डिसेंबर २०२४ पर्यंतच अर्ज भरता येणार आहे. इच्छुक नागरिकांनी https://housing.pmrda.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहेत.
दरम्यान, सदनिकांसाठी पहिल्यांदा अर्ज मागवले होते तेव्हा निम्म्याच जणांनी अनामत रक्कम भरली होती. त्यामुळे पुन्हा या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र या वेळेमध्ये आवश्यक ती कागदपत्रे नागरिकांना मिळाल्याने तसेच, विधानसभा निवडणुका आणि संकेतस्थळाला तांत्रिक अडचण आल्याने अर्जांची संख्या घटली होती. त्यामुळे पुन्हा म्हणजेच तिसऱ्यांदा या प्रक्रियेला मुदतवाढ घोषित केली होती.
...तर एक अर्ज होणार बाद
दोन वेगवेगळ्या प्रकल्पातील सदनिकांसाठी नागरिकांनी एकच अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोघांपैकी एकच अर्ज ग्राह्य धरणात येणार आहे. त्यामुळे एकूण अर्जांची संख्या तेवढी कमी होईल. तसेच, त्यांना पुन्हा अनामत रक्कम देखील द्यावी लागणार आहे. मात्र सद्यस्थितीमध्ये शिल्लक असलेल्या सदनिकांच्या तिप्पट अर्ज दाखल झाले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.