संग्रहित छायाचित्र
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून संचलनात असलेल्या बस मार्गावर कमी उत्पन्न प्राप्त होत आहे. त्याची कारणे शोधून काढण्यासाठी वाहतूक विभागाकडून आढावा घेण्यात येत आहे. त्यामुळे आता ज्या मार्गावर अपेक्षित उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न प्राप्त होईल, अशा चालक-वाहकांवर प्रशासकीय कारवाई करून याबाबतचा अहवाल प्रतिमाह १० तारखेपर्यंत वाहतूक व्यवस्थापक कार्यालयाकडे सादर करावा, असे आदेश मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी दिले आहेत. परिणामी, वाहक व चालकांवर प्रवासी वर्गाबरोबरच आता उत्पन्नवाढीचा ताण राहणार आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए हद्दीत दररोज पीएमपीएमएलच्या १६०० ते १७०० बस मार्गावर धावतात. यातून सरासरी १० लाखांवर प्रवासी प्रवास करतात. यातून पीएमपीला दिवसाला सरासरी दीड कोटी उत्पन्न प्राप्त होते; पण गेल्या काही दिवसांपासून उत्पन्नात घट झाल्याचे दिसून येत आहे. उत्पन्न वाढीसाठी पीएमपीएमएलने आता पावले टाकायला सुरुवात केली आहे. चालक-वाहक सेवक तसेच आगार व्यवस्थापक यांना सूचना देण्यात आल्या आहेत. शनिवार, रविवार व शासकीय सुटी वगळता आपापल्या आगाराकडील नेमून दिलेल्या बस मार्गावर जे वाहक-चालक सेवक सरासरी उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न आणतात, अशा वाहक, चालक, सेवकांचे दैनंदिन उत्पन्नाचा भरणा चेक करून सदर सेवकांना समक्ष बोलावून कमी उत्पन्न का प्राप्त होत आहे, याबाबत माहिती घेऊन मार्गावर जास्तीत जास्त उत्पन्न कसे आणता येईल, याबाबत आगार व्यवस्थापकांनी मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या मार्गावर अपेक्षित उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न प्राप्त होईल, अशा चालक-वाहक सेवकांवर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मेट्रो फिडरसेवेनंतरही प्रवासी वाढेनात
मेट्रो स्थानकापासून पिंपरी-चिंचवड शहरामध्ये विविध ठिकाणी फिडर सेवा सुरू आहे. पीएमपी प्रशासनाच्या वतीने शहरामध्ये जवळपास ९ ठिकाणी फिडर सेवा सुरू केली आहे. मात्र, या मार्गाला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे याबाबत पर्याय शोधण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येणार आहे. त्याबाबत मेट्रो प्रशासन आणि पीएमपीएमएल या दोन्ही विभागांची बैठक झाली.