संग्रहित छायाचित्र
लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. देशात भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) तर राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. त्यामुळे आता विविध पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. निवडणूका ह्या मार्च-एप्रिलमध्ये होतील, त्यानुसार सगळ्या पक्षातील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महापालिका निवडणूकीची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, महापालिका निवडणुका नव्या वर्षांत होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेवर मागील तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. या प्रशासकीय राजवटीत शहरातील नागरिकांची कामे होत नसल्याने आजही स्थानिक माजी नगरसेवकांचे उंबरे नागरिकांना झिजवावे लागत आहेत. त्यामुळे प्रशासकीय राजवट नको म्हणून पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते राज्यकर्त्यांना सागत आहेत. परंतू, लोकसभा, विधानसभा निवडणुका होईपर्यंत मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका घेतल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे प्रशासकीय राजवटीत नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. महापालिका निवडणुकीत पुन्हा महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तिकीटवाटप कसे होणार यांचे सुत्र ठरलेले नाही. आघाड्यामध्ये लढतीचा निर्णय झाल्यास शहरात धुसफूस निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक पदाधिकारी जो निर्णय घेतील, त्यानुसार निवडणूक लढवली जाईल, असे अनेकदा जाहीर केले आहे. तर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीद्वारेच महापालिका निवडणुकीस सामोरे जाऊ, असे घोषित केले आहे.
राज्यात महायुती सत्तेत असल्याने शहरात महायुतीकडे इनकमिंग वाढण्याचे संकेत मिळत आहेत. महायुतीमधील भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच, आरपीआय या पक्षात इच्छुकांची भरमसाठ संख्या आहे. राज्यात मोठे यश मिळाल्याने साहजिकच भाजपकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आरपीआयचे इच्छुकही कामाला लागले आहेत. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत कमकुवत झालेल्या महाविकास आघाडीकडेही ताकद कमी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना उबाठा , काँग्रेस, आप या पक्षाकडेही शहरात असंख्य इच्छुक आहेत. नवख्यांना येथे संधी मिळणार आहे.
आघाडी की स्वतंत्रपणे निवडणुका लढणार यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. आता कसल्याही परिस्थितीत नगरसेवक होणार, अशी गर्जना करीत इच्छुकांनी कंबर कसली आहे. तर, दुसरीकडे, प्रत्येक पक्षाच्या वाट्यास किती जागा येणार आहेत, त्यातून सर्वांचे समाधान कसे करणार आदी प्रश्न निर्माण होत आहेत. त्यासाठी कसब पणाला लागणार आहे. वरिष्ठ नेत्यांना बरीच कसरत करावी लागणार आहे. महापालिकेत १२ मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्याला पावणेतीन वर्षे झाली आहेत. या निवडणुका दहावी व बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यात होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या निवडणुका लोकसभा आणि विधानसभेप्रमाणे महायुती आणि महाविकास आघाडी अशी होईल अथवा प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरेल, याची प्रतीक्षा लागली आहे.
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित
महापालिका निवडणुका किती प्रभाग सदस्यानुसार घ्याव्यात. तसेच, वाढीव लोकसंख्येनुसार प्रभागांची वाढती संख्या या संदर्भातील विविध याचिका सर्वोच्च न्यायालयात आहेत. त्याची अंतिम सुनावणी होणे प्रलंबित आहे. राज्य सरकारने प्रयत्न केल्यास सुनावणी प्रक्रिया लवकर होऊ शकते. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर लगेच निवडणुका जाहीर होतील, अशी स्थिती आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.