संग्रहित छायाचित्र
भोसरी विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी पूर्णानगर, चिखली येथील महापालिकेच्या बहुउद्देशीय सभागृहात झाली. काही खर्च बँक खात्यातून न केल्याबद्दल नऊ उमेदवारांना नोटिसा दिल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांनी सांगितले.
निवडणूक खर्च निरीक्षक प्रेमप्रकाश मीना यांच्या उपस्थितीत निवडणूक खर्च तपासणी प्रमुख मलप्पा वाघमारे, वैजनाथ आव्हाड, मनोज हिंगे, साहाय्यक खर्च निरीक्षक राजेशकुमार कुशवाहा यांच्या अधिपत्याखाली उमेदवारांनी केलेल्या दैनंदिन खर्चाची तपासणी प्रक्रिया झाली. निवडणूक खर्च संनियंत्रण संदर्भातील तरतुदीनुसार उमेदवारांनी केलेल्या दैनंदिन खर्चाची तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी तीन टप्प्यांत करण्याचे नियोजन आहे. उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची दुसरी तपासणी १४ नोव्हेंबरला; तर तिसरी तपासणी १९ नोव्हेंबरला सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत होईल, असेही लबडे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचार खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये ११ उमेदवार असून त्यांच्या रोजच्या खर्चाचा तपशील लेखांकन पथकाकडे जमा केला जातो. त्याचवेळी शॅडो रजिस्टरमध्ये खर्च नोंदवला जातो, असेही लबडे यांनी नमूद केले.