पीएमआरडीएकडून साडेचारशे होर्डिंगला नोटीस

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीए अंतर्गत ९ तालुक्यातील अनधिकृत व धोकादायक जाहिरात फलक, आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स हटवण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

PMRDA News

संग्रहित छायाचित्र

अनधिकृत जाहिरात फलक हटवण्याचे आवाहन, अनुचित घटना टाळण्यासाठी कार्यवाही

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीए (PMRDA) अंतर्गत ९ तालुक्यातील अनधिकृत व धोकादायक जाहिरात फलक, आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स हटवण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार जवळपास ४२३ जणांना नोटीस देण्यात आली आहे. त्याबाबत अधिकृत परवानगी घ्यावी अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

फ्लेक्स व जाहिरात फलक मालक, जागामालक, विकासक, जाहिरातदार संस्था यांनी ते त्वरित हटवावेत किंवा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ३१ मार्चपर्यंत ते लावण्याची परवानगी घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. पीएमआरडीए क्षेत्रात असलेल्या मुख्य चौक, गर्दी वा वर्दळीच्या ठिकाणी, जास्त लांबी, रुंदी व उंचीचे, उंच इमारतीवरील कमाल मर्यादेपेक्षा मोठे तथा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या अनधिकृत, धोकादायक असलेले आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स येणाऱ्या उन्हाळी वाऱ्यामुळे पडून किंवा कोसळून जीवितहानी वा वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पीएमआरडीएच्या आकाशचिन्ह परवानगी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत १०५७ ठिकाणांचे सर्वेक्षण केलेले आहे. त्यापैकी ४२३ जणांना नोटीस दिली असून, १५६ जणांनी प्राधिकरण प्रशासनाकडे परवानगीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. उरलेल्या २६७ जणांना ३१ मार्चपर्यंत परवानगी घेण्याबाबत आवाहन केले आहे.

... तर आचारसंहितेची येणार अडचण

अनधिकृत होर्डिंग (Hoarding) व फ्लेक्स या विरोधात पीएमआरडीएकडून कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार निविदा मागवण्यात आल्या. पहिल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा निविदा मागवल्या होत्या. मात्र, आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर या होर्डिंगवर कारवाई करण्याबाबत तांत्रिक बाबी हा विभाग तपासून पाहात आहे.

मुळशीत सर्वाधिक होर्डिंग, फ्लेक्स

पीएमआरडीएच्या हद्दीमधील नऊ तालुक्यांपैकी सर्वाधिक फ्लेक्स हे मुळशी तालुक्यात आहेत. या परिसरात ३८६ फ्लेक्स असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यापाठोपाठ हवेली तालुक्यात २३१ तर, शिरूर तालुक्यात १२०, भोरमध्ये १११ फ्लेक्स असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वात कमी वेल्ह्यामध्ये १ तर, पुरंदरमध्ये १० फ्लेक्स आहेत. दरम्यान विभागाकडे आत्तापर्यंत ५ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.

अनधिकृत, धोकादायक होर्डिंग, बॅनर, फ्लेक्स त्वरित हटविण्यात आले नसल्यास पीएमआरडीकडून निष्कासित करण्यात येतील. तसेच होर्डिंगमुळे दुर्घटना घडल्यास संबंधित जाहिरातदार संस्था यांना व्यक्तिशः जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल,

-सुनील मरळे , महानगर नियोजनकार , विकास परवानगी विभाग, पीएमआरडीए

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest