शहरातील विविध सोसायट्यांकडून महापालिकेला मोठ्या प्रमाणात कर मिळत असतो. त्याबदल्यात काही पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित असते. असे असताना पालिका प्रशासन या सोसायट्यांना आवश्यक सुविधा देण्यात टाळाटाळ करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाकड येथील गोल्डफिंगर ऐवेनिर सोसायटी सदस्यांना हा अनुभव येत आहे.
सोसायटीच्या परिसरात साठलेला कचरा, राडारोडा, अर्धवट झालेले रस्त्याचे काम, पावसाळ्यात साठत असलेले पाणी यामुळे सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महापालिकेला अनेकदा पत्रव्यवहार केले, सारथीसारख्या हेल्पलाइनवर तक्रारही केली. मात्र, त्याची देखल घेतली नाही. अखेर आपल्या सोसायटीधारकांनी एकत्र येऊन स्वच्छता करण्याचे ठरवले आहे.
२ ऑक्टोबर अर्थात महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने महापालिका आणि ठेकेदाराच्या निषेधार्थ ही मोहीम राबवणार असल्याचे सोसायटीधारकांचे म्हणणे आहे.
वाकड परिसरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात सोसायट्या निर्माण झाल्या आहेत. त्या अनुषंगाने महापालिका करही आकारते. मात्र त्या बदल्यात कोणत्याही सुविधा देत नसल्याचे यावरून दिसून येते. पुणे-बंगळूर महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. येथील टीप टॉप या हॉटेलसमोरून येणाऱ्या भूमिगत पुलाजवळ ही सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये जवळपास दीडशेहून अधिक सभासद आहेत. मात्र, सोसायटीच्या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पदपथावर टाकण्यात आलेले अवजड पाईप, अर्धवट झालेले रस्त्याचे काम, सोसायटी समोर पडलेला राडारोडा, कोपऱ्यामध्ये टाकण्यात येत असलेला कचरा आणि पावसामुळे साठलेले पाण्यामुळे रहिवाशांचे हाल अशा परिस्थितीमध्ये रहिवासी जगत आहेत.
दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून सोसायटीधारक या समस्या महापालिकेला निदर्शनास आणून देत आहेत. आरोग्य विभागालाही वारंवार कळवण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे सोसायटीनजीक पाणी साचले होते. मात्र याची कोणतीही दखल महापालिकेचा संबंधित विभाग घेत नाही. पत्रव्यवहार करूनही दखल घेत नसल्याने थेट आयुक्तांच्या दरबारीही सारथीच्या माध्यमातून तक्रार केली. मात्र, या सोसायटीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने रहिवाशांनी पुढाकार घेतला आहे. विविध कर भरूनही सोयी पुरवत नसल्याने सोसायटीधारक स्वतः स्वच्छता करणार आहेत. महापालिका प्रशासनाचा निषेध म्हणून गांधी जयंती यानिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे.
या मोहिमेमध्ये सोसायटीचे सचिव प्रेम बिहारी, श्रीकांत भोर,अनुराग सिन्हा, संतोष कुमार,अभिषेक झा, संतोष घुगे यांच्यासह इतरही सोसायटीधारक यात सहभागी होणार आहेत. याबाबत बोलताना सोसायटीधारक वैभव कुमार म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून अधिक काळ आम्हाला हा त्रास सहन करावा लागत आहे. ज्या ठिकाणी तक्रार करणे आवश्यक आहे. त्या सर्व विभागाकडे तक्रार केली. मात्र यावरती ठोस अशी उपाययोजना कार्यात आलेली नाही. ड्रेनेजचे सांडपाणी कायम तुंबलेले असते. पदपथ उभारण्यात आले हे मात्र त्याचा वापर कचरा आणि पाईप ठेवण्यासाठी केला जात आहे. सोसायटीमध्ये असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांकडून आम्ही वेळोवेळी साफ करतो. मात्र, ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. पालिका प्रशासनाकडून यावरती ठोस उपाययोजना करण्यात याव्यात.
आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
गेल्या काही दिवसांमध्ये डेंग्यू, मलेरिया यासारख्या गंभीर आजाराची साथ सुरू आहे. तसेच, वेगवेगळे आजारही उद्भवत आहेत. त्यामुळे यापासून आपल्या कुटुंबीयांना संरक्षण करण्यासाठी सोसायटीधारकांनीच ही मोहीम राबवली आहे. डासांचे साम्राज्य, दुर्गंधी आणि अस्वच्छता यामुळे रोग बळावू नयेत, यासाठी उपयोजना करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागावर भरोसा राहिला नाही. परिणामी, सोसायटीधारकांनी पुढाकार घेतला आहे.