शिल्लक सदनिकांचा ताबा देण्याच्या हालचाली

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वाल्हेकरवाडी गृहप्रकल्पात आतापर्यंत ३६ कुटुंबांना घरांचे ताबे देण्यात आले आहेत. तर, एकूण ११५ जणांनी त्यासाठी पूर्ण पैसे भरले आहेत.

PMRDA

संग्रहित छायाचित्र

वाल्हेकरवाडी गृहप्रकल्पातील शिल्लक सदनिकांसाठी लवकरच सोडत, पीएमआरडीएकडून कार्यवाही सुरू, विभागास स्वतंत्र अधिकारी नेमण्याची मागणी

पंकज खोले-
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वाल्हेकरवाडी गृहप्रकल्पात आतापर्यंत ३६ कुटुंबांना घरांचे ताबे देण्यात आले आहेत. तर, एकूण ११५ जणांनी त्यासाठी पूर्ण पैसे भरले आहेत. दरम्यान, या गृहप्रकल्पातील शिल्लक राहणारी घरे आणि पेठ क्रमांक १२ मधील शिल्लक घरांसाठी पुढील काही दिवसांमध्ये सोडत काढण्याचे नियोजन आहे. तूर्तास या विभागास स्वतंत्र अधिकारी नसल्याने कामे खोळंबली आहेत. त्यामुळे पूर्ण अधिकारी नेमावा अशी मागणी होऊ लागली आहे.

वाल्हेकरवाडी, पेठ क्रमांक ३० व ३२ येथे पीएमआरडीएच्या वतीने ७९२ घरांचा गृहप्रकल्प साकारला आहे. या गृहप्रकल्पात ३७८ वन रुम किचन आणि ४९४ वन बीएचके सदनिका आहेत. त्याच्या कामाची मुदत सप्टेंबर २०१९ पर्यंत होती. मात्र, मुदतीत हा प्रकल्प पूर्ण न झाल्याने ठेकेदाराला चार वेळा मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, या गृहप्रकल्पातील सर्व सदनिकांसाठी सोडत काढण्यात आली, त्यातील २२० घरांसाठी अर्ज आले. शिल्लक राहिलेल्या घरांसाठी पुढील काही दिवसांमध्ये सोडत काढण्यात येणार आहे. यातील काही घरांचे ताबा देण्यात आले आहेत. तर, काही सदनिका शिल्लक आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेमधील पेठ क्रमांक १२ येथे आर्थिक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी गृहप्रकल्प उभारला आहे. या गृहप्रकल्पात एकूण ४ हजार ८८३ घरे उभारण्यात आली आहेत. आर्थिक दुर्बल गटासाठी ३३१७ तर, अल्प उत्पन्न गटासाठी १५६६ सदनिका आहेत. या गृहप्रकल्पात अल्प उत्पन्न गटांसाठी असलेल्या सर्व घरांचे वाटप अद्याप झालेले नाही. येथील शिल्लक राहिलेल्या सदनिकांसाठी पुन्हा नव्याने येत्या १५ दिवसांमध्ये सोडत काढण्यात येणार आहे.

वाल्हेकरवाडी,  पेठ क्रमांक १२ मधील गृहप्रकल्पात शिल्लक राहिलेल्या सदनिकांसाठी पुन्हा नव्याने सोडत काढण्यात येणार आहे. त्याबाबत म्हाडा प्रशासनाची चर्चा सुरू आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल.

– प्रभाकर वसईकर, जनसंपर्क अधिकारी तथा कार्यकारी अभियंता 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest