संग्रहित छायाचित्र
'तुकाराम बीज' निमित्त पीएमपीएमएलकडून पुणे, पिंपरी-चिंचवडच्या विविध मार्गांवर ज्यादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. बुधवारी (२७ मार्च) 'तुकाराम बीज' असल्यामुळे मंगळवार (२६ मार्च) ते गुरुवार (२८ मार्च) या कालावधीत ८ मार्गांवर या ज्यादा बस धावणार आहेत, अशी माहिती पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापकांनी दिली.
स्वारगेट ते देहूगाव, मनपा भवन ते देहूगाव, मनपा भवन ते आळंदी, देहूगाव ते आळंदी, स्वारगेट ते आळंदी, पुणे स्टेशन ते देहूगाव, निगडी ते देहूगाव आणि हडपसर ते आळंदी या मार्गावर ज्यादा बस सोडण्यात येणार आहेत. 'तुकाराम बीज' निमित्त जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी देहूगाव येथे मोठ्या प्रमाणात भाविक एकत्र येतात. तुकाराम बीजनिमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड आणि उपनगरातून देहूगाव येथे जाणाऱ्या भाविकांसाठी व प्रवाशांसाठी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पीएमपीएमएलकडून ज्यादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. ज्यादा बस नेहमीच्या तिकीट दरात धावतील.
त्याचप्रमाणे देहूगाव येथून परतीच्या प्रवासासाठी येथील झेंडे मळ्याजवळ मिलिटरी परिसरातील उजव्या बाजूच्या मोकळ्या जागेत परिवहन महामंडळाचे तात्पुरते बसस्थानक उभारण्यात असून या ठिकाणाहून पीएमपी जादा बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच देहूगाव ते आळंदी दर्शन जाण्याकरिता देहूगाव-आळंदी रस्त्यावर गाथा परिसरातील जगद्गुरू संत तुकाराम महाराज क्रीडांगणाजवळील गायरानाच्या मोकळ्या जागेतून ज्यादा बस सोडण्यात येतील.
या बस २६ ते २८ मार्च दरम्यान धावतील. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, पीएमपीएमएलकडून आणखी बस वाढवण्याचा विचार करण्यात आला आहे, अशी माहिती पीएमपीएमएलकडून देण्यात आली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.