संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात १८ते १०० वयोगटांतील मतदार आहेत. त्यातील तरूण व प्रौढ मतदारांची संख्या अधिक आहे. नव्या पिढीतील युवा मतदारांचा कौल शहरासाठी तीन नवे आमदार ठरवण्यात महत्वपूर्ण ठरणार आहे.
निवडणूक विभागाकडून नवमतदारांची नोंदणी केली जाते. त्यासाठी महाविद्यालयात जनजागृती मोहिमा घेतल्या जातात. त्यामुळे नवमतदार व युवा मतदारांची नोंदणी मोठ्या संख्येने होत आहे. ही युवा शक्ती निवडणुकीचा निकाल बदलू शकते इतकी आहे. शहरातील एकूण १६ लाख ४७ हजार ८३७ मतदारांपैकी तरूण मतदारांची संख्या ३ लाख १२ हजार ६७४ इतकी आहे. सर्व गटातील मतदानांची तुलना करता मतदान करण्याचा युवक वर्गाचा आकडा सर्वांधिक असतो.
बोपखेल, दापोडीपासून ते निगडी प्राधिकरणापर्यंत पसरलेला पिंपरी विधानसभा मतदार संघात एकूण ३ लाख ८७ हजार ९७३ मतदार आहेत. त्यातील ६७ हजार ५२१ मतदार हे तरूण व नवमतदार आहेत. या नव्या पिढीचा कौल पिंपरीच्या नव्या आमदारांसाठी खूपच महत्वाचा ठरणार आहे. सांगवीपासून रावेत, किवळेपर्यंत असलेल्या दाट लोकवस्तीचा चिंचवड मतदार संघ आहे. राज्यात दुसर्या क्रमांकाचा सर्वात जास्त मतदार असलेला म्हणून हा मतदार संघ ओळखला जातो. चिंचवड विधानसभेत ६ लाख ५६ हजार १५७ मतदार आहेत. त्यात १८ ते २९ वयाच्या युवक मतदारांची संख्या १ लाख १५ हजार ५३२ इतकी आहे. मतदार संघात ३० ते ३९ वयोगटातील मतदारांची सर्वात जास्त १ लाख ९३ हजार ५६० इतकी संख्या आहे. युवकांची पसंती ज्या बाजूला झुकणार आहे, तो चिंचवडचा नवा आमदार असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एमआयडीसी तसेच, समाविष्ट गावांचा समावेश असलेला भोसरी मतदार संघ आहे. मतदारसंघात ६ लाख ८४८ मतदार आहेत. त्यात १८ ते २९ वर्षांचे एकूण १ लाख २९ हजार ६२१ तरूण मतदार आहेत. या तरूण मतदारांचा कौल ज्या उमेदवारांकडे असेल, तो उमेदवार आमदार होऊ शकतो.
युवकांचे प्रश्न सोडवणाऱ्यांना संधी
युवा मतदार हा महाविद्यालय विद्यार्थी आहेत. त्यात खेळाडूंही आहेत. तसेच, त्यातील काहींनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून नोकरी सुरू केली आहे. तर, काही नोकरीच्या शोधात आहेत. या नव्या पिढीतील तरूण मतदारांचा कौल विधानसभेसाठी निर्णायक ठरणार आहे. युवकांशी निगडीत महाविद्यालयीन शिक्षण, दर्जेदार शिक्षण, उच्च शिक्षणांच्या संधी, भरमसाट फी, वाहतूक समस्या, रोजगार, उद्योगांच्या संधी, आरक्षण, तरूणींची सुरक्षा असे अनेक प्रश्न व समस्यांशी त्यांचा दररोजचा सामना होत आहे. या नियमित समस्या लक्षात घेऊन ते आपला प्रतिनिधी म्हणजे आमदार निवडतील, असाअंदाज वर्तविला जात आहे.
पिंपरी विधानसभा
एकूण मतदार - ३ लाख ८७ हजार ९७३
१८ ते १९ वयोगटातील मतदार - ६ हजार १८२
२० ते २९ वयोगटातील मतदार - ६१ हजार ३३९
एकूण युवा मतदार - ६७ हजार ५२१
चिंचवड विधानसभा
एकूण मतदार- ६ लाख ५६ हजार १५७
१८-१९ वयोगटातील मतदार-१२ हजार ७७७
२० ते २९ वयोगटातील मतदार-१ लाख २ हजार ७५५
एकूण युवा मतदार- १ लाख १५ हजार ५३२
भोसरी विधानसभा..
एकूण मतदार - ६ लाख ३ हजार ७०७
१० ते १९ वयोगटातील मतदार - १२ हजार ७००
२० ते २९ वयोगटातील मतदार- १ लाख १६ हजार ९२१
एकूण युवा मतदार - १ लाख २९ हजार ६२१