संग्रहित छायाचित्र
महापालिकेच्या वतीने पिंपरी ते दापोडी या मार्गावरील मेट्रो मार्गिकेच्या खालील पिलरखाली विद्युत रोषणाईद्वारे सुशोभीकरण करण्यात येत होते. मात्र, तो निर्णय प्रशासनाकडून मागे घेण्यात आला आहे. त्या कामाचा निधी यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयासाठी वळवण्यात आला आहे.
महामेट्रोने पिंपरी ते दापोडी या मार्गावर मेट्रोची मार्गिका तयार केली अहे. त्या उन्नत मार्गावरून मेट्रो धावत आहे. मेट्रो मार्गिकेखालील पिलरच्या जागेत महापालिकेच्या वतीने विद्युत रोषणाई करून सुशोभीकरण करण्यात येणार होते. त्या खर्चास स्थायी समितीने मान्यताही दिली होती. त्यासाठी महापालिका अर्थसंकल्पात ५ कोटी ७५ लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली होती.
मात्र, विरोध झाल्याने तसेच, महामेट्रोने प्रतिसाद न दिल्याने हा निर्णय मागे घेण्यात आला. ते काम रद्द झाल्याचे अधिकारी सांगत आहेत. त्या कामाचा निधी वायसीएम रुग्णालयात नवीन यूपीएस यंत्रणा बसवण्यासाठी केला जाणार आहे. त्यासाठी ४० लाखांचा निधी वायसीएममधील विद्युत कामासाठी वळवण्यात आला आहे.
वायसीएम रुग्णालयात ९ ऑपरेशन थिएटर, ३ मोठे आयसीयू, १ एनआयसीयू, प्रसूतिगृह, पोस्ट ऑपरेटिव्ह, प्री ऑपरेटिव्ह आदी अत्यावश्यक ठिकाणी २४ तास वीजपुरवठा आवश्यक आहे. त्यासाठी ८ केव्हीएचे ४ यूपीएस २०११ पासून यंत्रणा सुरू आहे. ती यूपीएस यंत्रणा वारंवार तांत्रिक बिघाडामुळे बंद होत आहे. त्यामुळे नवीन यूपीएस बसवण्यात येत आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात १ कोटी २० लाखांची तरतूद होती. ती रक्कम कमी पडत असल्याने मेट्रो पिलर सुशोभीकरणाच्या कामाचे ४० लाखांची रक्कम या कामासाठी वळवण्यात आली आहे. त्या वर्गीकरणास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची मान्यता दिली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.