संग्रहित छायाचित्र
मेट्रोच्या प्रवाशांच्या सुविधेसाठी मेट्रोथांब्यांना जोडणारी पीएमपीकडून मेट्रो फिडर सेवा सुरू करण्यात आली होती. त्या अनुषंगाने १२ मार्गांवर फिडर सेवा देण्यात आली. वारंवारिता व वेळेचे ताळमेळ नसल्याने ही सेवा गुंडाळावी लागते की काय, अशी शक्यता होती. मात्र, त्यानंतर पीएमपीच्या वतीने योग्य नियोजन करून तसेच, प्रवाशांच्या सर्वेक्षणानंतर त्या ठिकाणी बससेवा सुरू केल्यानंतर या सेवेला प्रतिसाद मिळू लागला आहे. आता फिडर सेवेत वाढ करून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात एकूण १६ मार्गांवर 'फिडर' सेवा सुरू आहे. मागील महिनाभरात पीएमपीएलला ४२ लाख ६५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामुळे आणखी काही मार्गांवर ही सेवा सुरू करण्याची चाचपणी सुरू आहे.
पिंपरी ते सिव्हिल कोर्ट आणि वनाज ते रामवाडीपर्यंत मेट्रोसेवा सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर झाला आहे. मेट्रो स्टेशन ते घरापर्यंत प्रवास करता यावा म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएल) शहरात १२ ठिकाणी फिडर सेवा सुरू केली आहे. पण, त्याचे योग्य नियोजन नसल्याची ओरड करण्यात आली होती. त्यातून बसची वाट पाहात प्रवासी निघून जात होते. या कारणामुळे ही सेवा तोट्यात जाऊ लागली. दरम्यान यानंतर पीएमपी अधिकाऱ्याने या सर्व मार्गांचे सर्वेक्षण केले. त्याचप्रमाणे प्रवाशांच्या गरजा ओळखून त्या ठिकाणी सेवेमध्येदेखील बदल केला. यामधून महिनाभरातच पीएमपीएल मालामाल झाली आहे.
दरम्यान, मेट्रोच्या प्रवासानंतर नागरिकांना बससेवा उपलब्ध नसल्याने खासगी वाहनांचा वापर वाढला होता. मात्र आता हे प्रवासी मेट्रो फिडर वाहनाकडे वळले असल्याचे दिसून येत आहे. कारण या महिनाभरात जवळ सर्वच मार्गावर मेट्रो फिडर सेवा अविरत सुरू आहे. त्यात कोणताही खंड पडला नाही. त्याचप्रमाणे तब्बल ४२ लाख रुपये उत्पन्नही मिळाले आहे. दरम्यान, प्रत्येक मेट्रो स्थानकावर पीएमपीएल मार्ग आणि सुटणाऱ्या बसेसचा तपशील स्पष्टपणे प्रदर्शित करावा, तसेच फिडर बसमध्ये वाढ करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
या स्थानकावर मेट्रो फिडर सेवा
स्वारगेट मेट्रो स्टेशन ते स्वारगेट मेट्रो स्टेशन वर्तुळ, शिवाजीनगर मेट्रो स्टेशन ते नरेगाव, धनकवडी ते स्वारगेट मेट्रो स्टेशन भारती विद्यापीठ स्वारगेट मेट्रो स्टेशन, राजस सोसायटी ते स्वारगेट मेट्रो स्टेशन, वनाज कंपनी मेट्रो स्टेशन ते वनाज कंपनी मेट्रो स्टेशन, गणपती माता ते डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन, सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन ते हडपसर, रामवाडी मेट्रो स्टेशन ते इंटरनॅशनल टेक पार्क खराडी, येरवडा मेट्रो स्टेशन ते लोहगाव विमानतळ. सेक्टर क्र. १२ पीएम आवास योजना भोसरी ते नाशिक फाटा मेट्रो स्टेशन, दिघी ते पिंपरी चौक मेट्रो स्टेशन पिंपरी मेट्रो स्टेशन ते मुक्ताई चौक, पिंपरी मेट्रो स्टेशन ते काळेवाडी फाटा, भक्त्ती शक्ती ते नाशिक फाटा मेट्रो स्टेशन.
सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी सेवेबाबत सर्वेक्षण केले होते. स्वारगेट स्थानकापासून ५ मार्गांवर फिडर बससेवा सुरू करण्यात आली आहे. मेट्रो फिडरची प्रवासी संख्या अधिक वाढवण्याचे प्रयत्न करणार आहे.
- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल