Maratha Kranti Morcha : मराठा क्रांती मोर्चाचा आज पिंपरी-चिंचवडमध्ये बंद
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाकडून शनिवार, ९ सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवड शहर बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला शहरातील विविध राजकीय पक्ष, शेकडो संघटनांनी पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनेही बंदला पाठिंबा दिला आहे.
उद्या, शनिवारी सकाळी १० वाजता पिंपरीगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून डीलक्स चौक मार्गे मुख्य बाजार पिंपरी या मार्गाने महामोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जालना येथील घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक यांची निषेध सभा होवून महामोर्चाची सांगता होणार आहे. या महामोर्चात पिंपरी-चिंचवड शहर बंदला जाहीर पाठिंबा देण्यासाठी शहरातील १८ पगड बारा बलुतेदार एकटवला आहे.
अनेक राजकीय व सामाजिक संघटनांनी बंदला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, जिजाऊ ब्रिगेड, मराठा महासंघ, मराठा छावा युवा संघटना, काँग्रेस पक्ष, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वराज्य संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष, मराठा महासंघ, श्री जगद्गुरू प्रतिष्ठान, अखिल भारतीय छावा, अखिल भारतीय मराठा महासंघ, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, वंचित बहुजन आघाडी, स्वराज्य अभियान, राजमाता जिजाऊ ज्येष्ठ नागरी संघ, अपना वतन संघटना, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, छावा युवा मराठा महासंघ, आम आदमी पार्टी, एमआयएम, भीमशाही युवा संघटना, राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी, भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समिती, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच, मराठा जोडो अभियान, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय इसाई महासंघ, दलित पँथर सेना, बौद्ध जनसंघ, शिवशाही संघटना, शिवप्रेमी जनजागरण समिती, मराठा महासभा यासह अनेक सामाजिक संघटना, कामगार संघटना, व्यापारी संघटना व मंडळांनी बंदला स्वयंस्फूर्तीने पाठिंबा दर्शवला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.