संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपळे गुरव येथील शाळा इमारतीमध्ये राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (स्मार्ट सेंटर) सुरू केले आहे. विद्यापीठामार्फत बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांकरीता अनेक व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम जून २०२३ पासून पिंपळे गुरव येथील महापालिका शाळा इमारतीत सुरू केले आहे.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ अधिनियम, २०२१ नुसार महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. उच्च कौशल्य असलेले रोजगारक्षम युवक निर्माण करण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि उच्च दर्जाचे कौशल्य शिक्षण देण्यासाठी तसेच, बेरोजगारी कमी करण्यासाठी, राज्याच्या आर्थिक वाढीस चालना देण्यासाठी विद्यापीठ सुरू केले आहे. विद्यापीठाने सुरुवातीला त्याचे ११ महिन्यांचे एकूण २० लाख ५८ हजार ३४ रुपये भाडे महापालिकेकडे जमा केले आहे. आता तीन वर्षांसाठी इतर वर्ग खोल्या आणि पार्किंगची मागणी विद्यापीठाने केली आहे. त्यासाठी महापालिका दरमहा २ लाख ६४ हजार १७८ रुपये भाडे घेणार आहे. या इमारतीतील तळमजला, पहिला मजला, दुसरा मजला व तिसरा मजला एकूण ९००.६२ चौरस मीटर क्षेत्र विद्यापीठासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे. विद्यापीठाने १९.३० रुपये प्रतिचौरस फूट दराने ११ महिन्यांचे एकूण २० लाख ५८ हजार ४३ रुपये भाडे महापालिकेच्या भूमि आणि जिंदगी विभागाकडे जमा केले आहे.
विद्यापीठाने नव्याने ३ वर्षांसाठी इमारत, पार्किंग व वर्गखोल्या भाडेकराराने देण्याबाबत ११ जून २०२४ ला महापालिकेस विनंती केली आहे. पूर्वीचे ९००.६२ चौरस मीटर आणि नव्याने ३७१.०२ चौरस मीटर असे एकूण १ हजार २७१.६४ चौरस मीटर जागा विद्यापीठाला हवी आहे. त्यासाठी ११०.३० रुपये चौरस फूटनुसार दरमहा २ लाख ६४ हजार १७८ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. हा दर १ जुलै २०२७ पर्यंत राहणार आहे. या भाडेदराला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.