संग्रहित छायाचित्र
राज्याच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागामार्फत २५ नोव्हेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत २१ वी पशुगणना करण्याचे कामकाज चालू केले आहे. महापालिका हद्दीत सदरचे पशुगणनेचे कामकाज मे. ऍनिमल हेल्थ ऑरगोनायझेशन या संस्थेमार्फत सुरु आहे. शासनाच्या विविध विकासाचे नियोजन, धोरणात्मक निर्णय घेणे तसेच दुध, अंडी व मांस या प्रमुख पशुजन्य उत्पादनाची आकडेवारी तयार करण्यासाठी पशुगणना महत्वाची आहे. महापालिका हद्दीतील घरगुती, संस्था व गोशाळांकडे असलेल्या १६ प्रजातींपैकी (गायवर्गीय, म्हैसवर्गीय पशूंसह मेंढी, शेळी, डुक्कर, घोडा, शिंगरु, खेचर, गाढव, उंट, कुत्रा, ससा, हत्ती व कुक्कट पक्षी (कोंबडी, बदक, टर्की आणि इमू, क्वेल, गिनी, शहामृग) यांची प्रजातीनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय व उपयोगानुसार ५० प्रगणकांकडे माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
या पशूधनांची होणार गणना
शेतकरी, पशुपालकांकडील कौटुंबिक पशूधन, उद्योग, संस्था, संघटनांनी पाळलेल्या गायवर्गीय, म्हसवर्गीय पशूंसह, मिथुन, मेंढी, शेळी, डुक्कर, घोडा, शिंगरू, खेचर, गाढव, उंट, कुत्रा, ससा, हत्ती आणि कुक्कुट पक्षी (कोंबडे-कोंबड्या, बदक, टर्की आणि इमू, क्वेल, गिनी, शहामृग) आदींसह सोळा प्रकारच्या प्राण्यांची मोजणी करण्यात येणार आहे. तसेच भटकी कुत्री, गटक्या गाई आणि प्रथमच भटका पशुपालक समुदाय (पॅस्टोरल कम्युनिटी) यांचीदेखील माहिती संकलित करण्यात येईल.
आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत मोबाइल ॲपच्या माध्यमातून ही पशुगणना केली जात आहे. शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी पशुगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना आपल्याकडील पशूंची अचूक आणि योग्य माहिती द्यावी. पशुगणनेच्या माध्यमातून नागरी व ग्रामीण क्षेत्रातील कुटुंब, कौटुंबिक उपक्रम, बिगर – कौटुंबिक उपक्रम आणि संस्था, गोशाळा यांच्याकडे असलेल्या पशुधनाच्या १६ प्रजाती व कुक्कुट पक्षी यांची जातीनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय आकडेवारी गोळा केली जाणार आहे.
- संदीप खोत, उपायुक्त, पशुवैद्यकीय विभाग, महापालिका, पिंपरी-चिंचवड
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.