आता होऊ द्या खर्च, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर १४४ कोटींचा खर्च

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Old Pune-Mumbai Highway ) पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात दापोडी ते निगडी या मार्गावरील पदपथ अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार विकसित करण्यात येणार आहे.

Old Pune Mumbai Highway

संग्रहित छायाचित्र

पिंपरी-िचंचवडमधील ११. १७ किलोमीटर रस्त्याचा करणार कायापालट, पदपथ अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार विकसित करणार

विकास शिंदे
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Old Pune-Mumbai Highway ) पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात दापोडी ते निगडी या मार्गावरील पदपथ अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार विकसित करण्यात येणार आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंतच या कामासाठी ४९ कोटी ८१ लाख खर्च आहे तर, पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळा चौक ते दापोडीतील हॅरिस पुलापर्यंतच्या कामासाठी ९३ कोटी ७८ लाख ५२ हजार खर्च आहे. असे एकूण ११.७० किलोमीटर अंतराच्या एका बाजूच्या रस्त्याचा कायापालट करण्यासाठी तब्बल १४३ कोटी ६० लाखांचा खर्च केला जाणार आहे. (Pimpri Chinchwad Municipal Corporation)

महापालिकेच्या वतीने शहरातील मुख्य व उपनगराची रस्त्यांची अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्यात रस्ते अरुंद करून पदपथ रुंद करण्यात येत आहेत. तसेच, सायकल ट्रॅक व सुशोभीकरण केले जात आहे. मात्र, दुकानदार, पथारी व विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने तसेच, वाहने पदपथावर लावली जात असल्याने पदपथ अपुरे पडत आहेत. पादचारी व सायकलस्वारांना मार्ग मिळत नसल्याने त्यांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे छोटे-मोठे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी दिशादर्शक व स्थळफलक गायब झाले आहेत. वाहनांना अडथळा करणार्‍यांसाठी लावलेले गोलार्ड (कठडे) तुटून त्यांची दुरवस्था झाली आहे. रोपे जळाल्याने तेथे गवत व झुडूप उगवले आहे.

शहरातील बहुतांश अर्बन स्ट्रीट डिझाइनने केलेल्या रस्ते सुशोभीकरण कामाची अशी स्थिती असताना आता पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील दापोडी ते निगडी या शहरातील मध्यवर्ती रस्त्यांचे सुशोभीकरण करण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. या मार्गाच्या सर्व्हिस रस्त्यांच्या दोन्ही बाजूस पदपथ सुशोभीकरणाचे काम केले जाणार आहे. पिंपरी चौक ते निगडी शक्ती-शक्ती चौक या एका बाजूच्या कामासाठी ५८ कोटी ६७ लाख ३९ हजार खर्चाची निविदा मागविण्यात आली होती. निखिल कन्स्ट्रक्शन ग्रुप प्रा. लि.ची १६.५० टक्के कमी दराची ४९ कोटी ८१ लाख खर्चाची निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. या कामासाठी ६ निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ५ निविदा पात्र ठरल्या. दर कमी असल्याने संबंधित ठेकेदाराकडून ५ कोटी ३२ लाखांची अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम जमा करून घेण्यात आली आहे. तर, पिंपरी चौक ते दापोडीच्या हॅरिस पुलापर्यंतच्या एका बाजूच्या कामासाठी १०८ कोटी ९३ लाख ३९ हजार खर्चाची निविदा काढण्यात आली होती. 

कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.ची १५.०५ कमी दराची ९३ कोटी ७८ लाख ८५ हजार खर्चाची निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. या कामासाठी ५ निविदा प्राप्त झाले होते. दर कमी असल्याने संबंधित ठेकेदाराकडून ६ कोटी ६७ लाख २० हजारांची अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम जमा करून घेण्यात आली आहे. या दोन्ही कामांची मुदत २ वर्षे आहे.  या दोन्ही कामाच्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest