संग्रहित छायाचित्र
महापालिकेच्या शहरी पथ धोरणांतर्गत (अर्बन स्ट्रीट गाइड लाइन्स) मोरवाडीतील कापसे उद्यानासमोरील रस्ता विकसित करण्यात आला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून त्याचा पदपथ सुशोभित केला आहे. मात्र, वर्दळीचा रस्ता अरुंद झाला असून वाहनतळ, वाहतूक कोंडीचा प्रश्न तीव्र झाला आहे. अर्बन स्ट्रीटच्या आकृतिबंधानुसार पदपथ प्रशस्त करण्यात आले असून पदपथावर हातगाडी, पथारी विक्रेत्यांनी अगदी टेबल, खुर्च्या मांडूनच व्यवसाय थाटले आहेत. त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असून पादचारी नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे हा खर्च नेमका कशासाठी, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
नवीन पदपथ तयार करणे व जुन्यांची दुरुस्ती करण्यावर दरवर्षी महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. परंतु अतिक्रमणांमुळे ९० टक्के पदपथांचा वापर पादचाऱ्यांना करता येत नाही. त्यामुळे, एकीकडे वाहनांची संख्या वाढत असताना पदपथ रुंद केल्याने रस्ते अरुंद होत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. मात्र, त्यानंतरही कोंडी सोडवण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. मुळातच या मार्गावर ‘पार्किंग झोन’ नाहीत. त्यामुळे, वाहने पदपथ व रस्त्यांवर उभी केली जातात. त्याने पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागते. अनेक ठिकाणी दुकाने, विक्रेते व टपऱ्यांचे अतिक्रमण झाल्याने पदपथ गायब झाले आहेत.
एवढा खर्च नेमका कोणासाठी?
सम्राट चौक ते मोरवाडी रस्त्यावरील विकसित पदपथ प्रशस्त झाले आहेत. मात्र, त्याचा फायदा पादचाऱ्यांपेक्षा छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना अधिक होऊ लागला आहे. या रस्त्यावरील पदपथांवर दुकानदार, विक्रेते, वाहनचालक अतिक्रमण करत आहेत. दुकानदार साहित्य पदपथावर मांडतात. वाहने थेट पदपथावरच उभी केलेली दिसून येत आहेत. हातगाडी, पथारी विक्रेत्यांनी अगदी टेबल, खुर्च्या मांडूनच व्यवसाय थाटले आहेत. या अतिक्रमणांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असून पादचारी नागरिकांना नाईलाज म्हणून छोट्या झालेल्या रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे, हा खर्च नेमका कोणासाठी करण्यात आला आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रस्त्यालगतच्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसह हातगाडी, पथारी व्यावसायिकांना प्रशस्त असे पदपथ वापरण्यास मिळू लागले आहेत. काही व्यावसायिकांना त्या माध्यमातून वाहनतळाची उत्तम व्यवस्था झालेली आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना प्रशस्त पदपथावरून चालता यावे, हा मूळ उद्देश असफल होऊ लागला आहे. पदपथ एकसलग नसल्याने पादचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. -दीपक भोजने, नागरिक, मोरवाडी
‘अर्बन स्ट्रीट डिझाईन’मुळे वाहतूक रहदारी अधिक सुरक्षित होणार आहे. प्रशस्त पदपथ नागरिकांसाठी केले आहेत. त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. सजग नागरिकांनी तत्काळ महापालिककडे कारवाई करण्याची मागणी करणे अपेक्षित आहे. महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पदपथ आणि रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करावी. - बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता, महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.