संग्रहित छायाचित्र
पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या मार्गावर असलेल्या बीआरटी रस्त्याची विविध कारणांनी दुरावस्था झालेली आहे. मार्गामध्ये टाकण्यात येणारा कचरा, जागोजागी वाढलेले झुडपे, भटकी जनावरांचा वावर, ठिकठिकाणी पडलेले खड्डे अन् तुटलेले बॅरिकेट्स यामुळे करोडो रुपये खर्च करून उभारण्यात बीआरटी मार्गाचे मोठ्या प्रमाणात विविध विद्रपीकरण होत आहे. पीएमपीएमएल आणि पिंपरी चिंचवड महापालिका त्या दोघांमध्ये समन्वय नसल्याने या मार्गाची वाट लागलेली आहे.
किवळे ते औंध या मार्गावर असलेल्या बी आर टी मध्ये काळेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. तर, डांगे चौकामध्ये हा मार्ग खाजगी वाहने आणि रिक्षा चालकांनी व्यापलेला असतो. त्यामुळे या ठिकाणी बीआरटी मध्ये बस चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. वाकड रस्त्यावरती वळण घेत असताना या चौकात हमखास अपघात होतात. अनेकदा या मार्गाची डागडुजी करून देखील समस्या सुटलेली नाही.
भक्ती शक्ती-रावेत मार्गावर देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने कोट्यवधी खर्च करून बांधण्यात आलेल्या बाह्यवळण मार्गाचे या प्रकारे विद्रुपीकरण होताना दिसत आहे. या मार्गावर पदपथावर बऱ्याच वृक्षांना संरक्षण जाळ्या नसल्याने ती झाडे गुरे, शेळ्या, मेंढ्या खात आहेत, अनेक उपद्रव्यांनी झाडांचे नुकसान करत आहेत. पदपथ व बीआरटी मार्गात नियमित सफाई होत नसल्याने जागोजागी कचरा पडला आहे. त्यामुळे देखभालीकडे उद्यान आणि आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे का, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
दुसरीकडे, देहू आळंदी ते काळेवाडी या मार्गावर बीआरटी रस्त्यावरती खाजगी वाहनांचा शिरकव अ थांबलेला नाही. त्यातच या मार्गावर कचरा टाकला जातो. तसेच, येथील बॅरिगेटवर कपडे टाकले जातात. एखादा कपडा उडून वाहनाच्या चाकामध्ये अडकल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे हा मार्ग इतर मार्गापेक्षा मोठा असल्याने बसा वेग अधिक असतो. परिणामी, अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेकदा या मार्गावर रिक्षा देखील थांबवल्या जातात.
बीआरटी विभागाचे कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
चालायला जाताना पदपथावर जागोजागी कचरा व कपडे पडलेले असतात. पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणात कचरा पडतो. अनेक बस थांब्यावरती थेट दुचाकी देखील पार्क केल्या जात होतो. तर, काही बीआरटी मार्गावरती खड्डे पडले आहेत.
- संदेश पुजारी, ज्येष्ठ नागरिक, प्राधिकरण
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.