'काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता' एकसलग बीआरटी मार्ग प्रवाशांना होणार उपलब्ध
पिंपरी-चिंचवड : शहरातील नागरिकांना जलद गतीने सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी म्हणून महापालिकेने बीआरटी मार्ग तयार केले आहेत. महापालिकेने काळेवाडी फाटा ते चिखलीच्या देहू-आळंदी रस्ता या ११ किलोमीटर अंतराचा बीआरटीएस मार्ग विकसित केला. मात्र, ऑटो क्लस्टरसमोरील केवळ साडेतीन हजार चौरस मीटर जागा ताब्यात न आल्याने या मार्गाला अडथळा निर्माण झाला होता. अखेर १४ वर्षांनी त्या कंपनीची जागेवरील इमारती पाडण्यात येत आहे. त्यामुळे तीन महिन्यांत हा एक सलग मार्ग प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.
काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता या बीआरटी मार्गावर ऑटो क्लस्टर व आयुक्त बंगल्यासमोरील युरोसिटी व इंड्रोलिक इंडस्ट्रियलची केवळ साडेतीन हजार चौरस मीटर जागा महापालिकेच्या ताब्यात आली नव्हती. त्या उद्योगांना महापालिकेने २००७ ला नोटीस दिली होती. नोटीस देऊन १४ वर्षे झाले तरी अद्याप बीआरटी मार्ग सुरू झालेला नाही. त्यामुळे पीएमपी बससह इतर वाहनांना १ किलोमीटर अंतराचा वळसा मारून ये-जा करावी लागत आहे. वापरत नसलेल्या मार्गाचा वापर वाहन शिकणे, जॉगिंग व चालणे, स्केटींग सरावासाठी केला जात आहे. तसेच, मद्यपी व प्रेमीयुगलाचा तो अड्डा झाला होता.
मार्गात अडथळा ठरणार्या उद्योगांचे स्थलांतर करण्यासाठी एमआयडीसीच्या केएसबी चौकातील डी टू ब्लॉक येथील जागा देण्यात आली आहे. त्यासाठी ७ कोटी रूपये महापालिकेने एमआयडीसीला दिले आहेत. बांधकाम परवानगी घेतल्यानंतर ९ महिन्यांत उद्योजक बांधकाम पूर्ण करणार आहेत. त्यानंतर ते महापालिकेस जागा हस्तांतरण करणार आहेत. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याने युरो सिटी व इंड्रोलिक इंडस्ट्रियलची इमारत पाडण्यास सुरूवात करण्यात आली आहे. पाडकाम झाल्यानंतर लवकर रस्ता बनवून बीआरटीचे बॅरिकेट्स उभारले जातील. त्यास किमान ३ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
लवकरच रस्त्यांचे काम सुरू करणार
बीआरटीएस मार्गास ऑटो क्लस्टर समोरील दोन कंपन्यांच्या इमारतींचा अडथळा होता. त्या कंपन्यांचे एमआयडीसी,भोसरी येथील डी टू ब्लॉक येथे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामुळे जुन्या इमारती पाडण्यास सुरूवात केली आहे. बीआरटीचा मार्ग तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे.निवडणूक आचारसंहिता उठल्यानंतर तीन कोटी खर्चाची निविदा प्रसिद्ध केली जाईल. उर्वरित कामास किमान ३ महिने लागतील. त्यानंतर एकसलग बीआरटी मार्ग सुरू होईल, असे महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.
बीआरटी मार्गाची सद्यस्थिती
काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता अंतर ११ किलोमीटर
अडथळा ठरणार्या कंपन्यांना २०१७ ला महापालिकेची नोटीस
स्थलांतरासाठी महापालिकेकडून ७ कोटींचा एमआयडीसीला निधी
केएसबी चौकातील डी टू ब्लॉक येथील जागेत उद्योगांसाठी बांधकाम करण्यास सुरूवात
अडथळा ठरणार्या दोन इमारती पाडण्यास सुरूवात
नवीन कामासाठी ३ कोटींचा खर्च अपेक्षित
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.