आयटी पार्कने घेतला मोकळा श्वास!
हिंजवडीतील आयटी पार्क (Hinjwadi IT Park) परिसरातील रस्त्यावरील कचरा उचलण्याची कार्यवाही सुरू झाली असून, आज सकाळी हिंजवडी-मारुंजी रस्ता एकदम चकाचक दिसून आला. यामुळे स्थानिक नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी ‘सीविक मिरर’चे आभार मानले आहेत. जिल्हा प्रशासनाने अशाच प्रकारे वेळोवेळी कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
‘सीविक मिरर’ ने आयटी नगरी कचऱ्याच्या विळख्यात या मथळ्याखाली हिंजवडी परिसरातील कचऱ्याची समस्या विस्तृतपणे मांडली होती. त्याची दखल घेऊन तातडीने या ठिकाणचा कचरा उचलण्यात आला. तसेच, या ठिकाणी कचरा टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाकडून कार्यवाही न झाल्याने येथील शेतकरी अंकुश जगताप यांनी कचऱ्याचे प्रदर्शन देखील मांडले होते.
हिंजवडी आणि मारुंजी या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा पडत होता. या कचऱ्यामुळे शेतीही धोक्यात आली होती. याबाबत स्थानिक नागरिक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. आता लगेच तो कचरा उचलण्यात आला आहे. याबाबत मारुंजीचे ग्रामविकास अधिकारी तुळशीराम रायकर यांनीही दुजोरा दिला आहे. त्याचप्रमाणे वेळोवेळी हा रस्ता स्वच्छ करण्यात येईल असेही कळवले आहे.
अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याची दखल घेतली नाही. ‘सीविक मिरर’ च्या माध्यमातून आमची समस्या मांडल्यामुळे त्याची तत्काळ दखल घ्यावी लागली. येथून पुढेही प्रशासनाकडून स्वच्छतेची दखल घेतली जावी.
-अंकुश जगताप शेतकरी
आज जगताप चौक रस्ता चकाचक दिसून आला. इतर वेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. तो कचरा उचललाही जात नाही. त्यामुळे येथून प्रवास नकोसा वाटतो.
शिरीष कामत, अभियंता, हिंजवडी
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.