'आयटी नगरी' कचऱ्याच्या विळख्यात
हिंजवडी : जगाच्या नकाशावर 'आयटी' हब म्हणून नावलौकीक मिळवलेला हिंजवडीचा परिसर सर्वत्र साचलेल्या कचऱ्याच्या समस्येने त्रस्त झाला आहे. पीएमआरडीए आणि हिंजवडी ग्रामपंचायत या दोघांच्या निष्क्रिय कारभारामुळे घनकचरा व्यवस्थापनावर ठोस उपयोजना होताना दिसून येत नाही. परिणामी, शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे
'स्मार्ट सिटी'मध्ये समाविष्ट असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेलगतच हिंजवडी ग्रामपंचायत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून आयटीयन्स, विद्यार्थी आणि व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात आयटी नगरीत येतो. मात्र, पायाभूत सुविधा न मिळाल्याने हा वर्ग त्रासलेला आहे. आधीच वाहतूक कोंडीत अडकलेला हिंजवडी- मारुंजी मार्ग आता कचऱ्याच्या विळख्यात सापडला आहे.
हिंजवडीतील बहुतांश रस्त्यांवर हॉटेलमधील सडलेले अन्न, गोणी भरून नारळाच्या करवंट्या, कापलेल्या केसांचा अर्ध्या ब्लेडसह ढीग, तर कुठे प्लास्टिकच्या थैल्या भरून घरातील कचरा, दारूच्या बाटल्यांबरोबर प्लास्टिक ग्लास व बाटल्यांचा खच हा सर्व कचरा थेट शेतीत आणि शेतीच्या रस्त्यालगत टाकला जातो. स्थानिकांनी वारंवार कचरा समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येते. रस्त्यालगत अजूनही पथदिवे नाहीत, गावभर बसवलेले सीसीटीव्ही या रस्त्यावर नाहीत, हीच मूळ समस्या आहे. अंधाराचा फायदा घेत इथे बिनधास्त कचरा फेकण्याचे प्रकार वाढले आहेत.
हिंजवडी परिसरात अलीकडे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. बाहेरील नागरिक आणि कामगार वर्ग या ठिकाणी आहे. त्यांच्याकडून या ठिकाणी रस्त्यावरच कचरा फेकला जातो. हा प्रकार थांबवण्यासाठी तत्काळ पाथदिवे अन सीसीटीव्ही बसवण्याची गरज आहे. माण आणि मारुंजी या आदर्श ग्रामपंचायत म्हणवून घेतात. मात्र येथील अनेक व्यसवसायिक, दुकानदार, हॉटेलवाले, आणि रहिवासी त्यांचा कचरा थेट हिंजवडीत शेतीलगत खोडसाळपण टाकतात.
बिल्डरांना सुविधा, शेतकऱ्यांना फास ?
बांधकाम व्यावसायिकांनी उभारलेल्या गृहप्रकल्पासमोरील परिसर चकाचक ठेवला जातो. त्यांच्या प्रकल्पासमोर घाण अथवा कचरा पडू नये म्हणून विशेष काळजी घेतली जाते. त्या ठिकाणी कचरा गाडी पोहोचते. त्यामुळे तिथे कोणी कचरा टाकत नाही. मात्र नागरी वस्त्यांतील कचरा शेतीलाटाच्या परीरात का टाकण्यात येतो, शेतकऱ्यांभोवतीच कचऱ्याचा हा फास कशासाठी,असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.
मग पीएमआरडीए प्रशासन करते तरी काय ?
हिंजवडी-मारुंजी लिंकरस्ता हा पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तयार केला आहे. शेतकऱ्यांनी विनातक्रार जमीनही दिली. मात्र रस्ता झाल्यावर याची व्यवस्था पाहण्याकडे पूर्ण डोळेझाक होत आहे. ग्रामपंचायत अधूनमधून कचऱ्याचा ढीग उचलून नेते. मग केवळ मलिदा खाण्यासाठी, अतिक्रमण विरोधी कारवाई आणि अथवा दंड वसुलीसाठी प्राधिकरण येते का, असा सवाल उपस्थित होत आहे.
शेतकऱ्यांनी लढवली अनोखी शक्कल
आयटी नगरीतील कचऱ्यामुळे वैतागलेल्या हिंजवडीच्या एका शेतकऱ्याने शेतीच्या रस्त्यालगत थेट कचऱ्याचे प्रदर्शनच लावले आहे. आयटीच्या प्रवेशद्वारावर जगताप चौक येथेच उभे राहून प्रदर्शन पाहण्यास येण्याची हात जोडून नम्र विनंती केली. कचरा समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी हा उपक्रम ११ मार्च रोजी राबवण्यात आला. येथील शेतकरी अंकुश जगताप यांनी लोकप्रबोधन व्हावे यासाठी हा उपक्रम हाती घेतला. मागील पंधरा दिवसापासून रात्री अकरापर्यंत तर कधी पहाटे चारलाच उठून शेतात जाऊन लोकांना कचरा टाकू नका म्हणून जनजागृती केली. ग्रामसेवक दखल घेईना, कारवाईचे बोलेना. आम्ही शेतकरी स्वतः पकडून देतो म्हणालो, बक्षीस जाहीर करा अशी विनंती केली, तर उत्तर देईना. शेवटी नाईलाजाने हा उपक्रम राबवावा लागल्याचे शेतकरी अंकुश जगताप यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीमार्फत कचरा संकलनाचे काम वेळोवेळी सुरू आहे. त्याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत. घरोघरी गाड्या जातात. मात्र अंधाराचा फायदा घेऊन कचरा टाकतात.
-तुळशीराम रायकर, ग्रामविकास अधिकारी, मारुंजी
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.