महामार्गावर फुलताहेत बेकायदेशीर उद्योग
रोिहत आठवले
टँकरमधून अवैधरित्या गॅस (gas illegally) काढून घेत असताना सिलिंडरचे एका (Illegal Industries) पाठोपाठ ९ मोठे स्फोट झाले. या स्फोटाची भीषणता इतकी होती की परिसरातील सोसायट्यांना हादरा बसला. शहराच्याच जीवावर बेतणारी गॅस चोरी हा एकच अवैध धंदा नाही तर शहरालगतच्या महामार्गावर स्टील, ऑइल, डिझेल-पेट्रोल चोरी, सिमेंट आणि डांबर भेसळ असे अनेक रॅकेट आजही सुरू आहेत. स्थानिक पातळीवरील पोलिसांचे हात ओले असल्याने याकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र, रविवारी (८ ऑक्टोबर) रात्री झालेल्या स्फोटामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच महामार्गालगत(Highway) सुरू असलेल्या या अवैध उद्योगांकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
महामार्गावरून वेगवेगळ्या ऑईलचे टँकर धावत असतात. महामार्गालगत निर्जन ठिकाणी या टँकरमधून ऑइल काढून घेतले जाते. टँकरचालक देखील या रॅकेटमध्ये सहभागी असतात. चोरून काढलेल्या या ऑईलची शहरभर विक्री केली जाते. या रॅकेटमध्ये असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. तसेच, सिमेंटच्या पोत्यांमध्ये देखील भेसळ करून त्याची विक्री करण्याचे उद्योग काही मंडळी करीत आहेत. जुन्या मुंबई- पुणे आणि पुणे-बंगळुरू महामार्गावरून गॅससह पेट्रोल/डिझेलची वाहतूक केली जाते. स्थानिक पोलिसांना हाताशी धरून काहीजण टँकरमधून पेट्रोल/डिझेल काढून घेतात. मोठ्या बांधकाम साईटवर असलेल्या जेसीबी आणि अवजड वाहनचालकांना या पेट्रोल/डिझेलची कमी दरात विक्री केली जाते.
दररोज रात्री हा गोरखधंदा सुरु असतो. खास करून तळेगाव दाभाडे येथील एका हॉटेलच्या परिसरात आणि चाकण परिसरात विमानाशी संबंधित इंधनाचा काळाबाजार चालतो. तसेच शिरगाव भागात डांबर भेसळ होत असल्याचे आता बोलले जात आहे. शहरात स्टील चोरीचे देखील मोठे रॅकेट आहे. या धंद्यामध्ये काही मोठे भांडवलदार उतरले आहेत. मोठ्या बांधकाम साईटवर स्टील (लोखंडी सळई) घेऊन जाणाऱ्या वाहनांमधून काही टन स्टील उतरवले जाते. त्यानंतर वजनकाटा 'मॅनेज' करून वजनाची खोटी पावती घेतली जाते. बांधकाम साईटवर असलेल्या सुपरवायझरला पावती दाखवली जाते. सुपरवायझरने हरकत घेऊन पुन्हा वजन करण्याचा आग्रह केल्यास त्याला चिरीमिरी देऊन गप्प केले जाते. त्यानंतर चोरलेले स्टील अल्पदरात छोट्या व्यावसायिकांना विक्रीसाठी दिले जाते. यांचा थेट फटका मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना बसत आहे.
महामार्गालगतच वेश्या व्यवसायही बहरला आहे. मागील काळात शहर परिसरातील वेश्या व्यवसायाला पूर्णपणे लगाम लावण्यात पोलिसांना यश आले होते. मात्र, नुकतेच काही महिन्यांपासून पुन्हा एकदा वेश्याव्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मोबाईलवर फोटो पाठवून लॉजवर तरुणी पाठवल्या जात आहेत. स्थानिक पोलिसांपुरते मर्यादित असलेल्या या रॅकेटकडे देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद करण्यासाठी स्थानिक पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, वेळोवेळी अवैध धंद्यावर कारवाई केली जाते. याव्यतिरिक्त कोठे अवैध धंदे सुरु असल्यास नागरिकांनी नजीकच्या पोलिस ठाण्यात जाऊन माहिती द्यावी.
-सतीश माने, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा), पिंपरी-चिंचवड.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.