संग्रहित छायाचित्र
वाहनांचे थकीत कर, योग्यता तपासणी प्रमाणपत्र, इ चलन हे आवर्जून तपासणाऱ्या आरटीओला ड्रायव्हिंग स्कूल चालकांच्या तपासणीसाठी वेळ मिळत नसल्याचे दिसून आले.दरवर्षी ड्रायव्हिंग स्कूल्सची तपासणी करणे आवश्यक आहे. तपासणी होत नसल्याने परिणामी वाहन चालवण्याचे जेमतेम प्रशिक्षण देऊन चालकांना रस्त्यावर उतरवले जात असल्याची शक्यता आहे.
रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मोटार वाहन ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचे चालक निर्माण होण्यासाठी त्यांना राज्य परिवहन विभागाने श्रेणी पद्धत लागू केली आहे. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत २३२ नोंदणीकृत ड्रायव्हिंग स्कूल आहेत. शाळेची प्रशिक्षण देण्याची पद्धती कशी आहे, या सर्व बाबींची तपासणी झाल्यानंतर संस्थेला शंभर गुण मिळणे आवश्यक आहे. जर तपासणीमध्ये पन्नासपेक्षा कमी गुण मिळाले असतील, सहा महिन्यांत त्यांच्यात सुधारणा झाली नाही तर त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार आरटीओ अधिकाऱ्यांना आहे. या संस्थांचा दर्जा कायम राहण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे दर सहा महिन्यांतून या संस्थांना अचानक भेटी देऊन त्याचे अहवाल परिवहन आयुक्त कार्यालयास त्याच दिवशी ई-मेल किंवा फॅक्सद्वारे सादर करणे अनिवार्य आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या तपासी नंतर पुन्हा तपासणी झाली नसल्याचे दिसून आले आहे. या दोन वर्षांमध्ये गल्ली बोळात तसेच, आरटीओ कार्यालायलगत मोठ्या प्रमाणात ड्रायव्हर स्कूल स्थापन झाले आहेत. त्यामुळे त्यांची तपासणी करणे अनिवार्य असताना गेल्या दोन वर्षापासून ती तपासणी झाली नसल्याचे दिसून येत आहे.
प्रत्यक्षात तपासणी केल्यानंतर विविध सुविधांची पाहणी केल्यानंतरच त्यांना गुण देण्यात येतात. त्यात संस्थेसाठी प्रशस्त जागा, क्लासरूम आणि प्रसाधनगृह, फर्निचर, वाचनालय, दृकश्राव्य साहित्यासाठी २० गुण, वाहनांची स्थिती प्रशिक्षणादरम्यान वाहनाची सर्वसाधारण माहिती उमेदवाराला होण्यासाठी आवश्यक असलेल्या मॉडेलसाठी २० गुण, प्रशिक्षण देण्याची क्षमता, चालवण्याचा पाच वर्षांचा अनुभव यासाठी २५ गुण आहेत. प्रशिक्षणार्थीना अतिरिक्त सुविधा दिल्या जातात किंवा नाहीत याबाबत प्रशिक्षणार्थीकडून माहिती घेऊन १० गुण अशा पद्धतीने त्याची श्रेणी ठरली जाते. ७५ पेक्षा अधिक गुण असलेल्याला अ श्रेणी, ६० ते ६५ या दरम्यान ब श्रेणी तर त्यापेक्षा कमी असलेल्या ड्रायव्हिंग स्कूल क श्रेणी देण्यात येते.
केवळ दोघांवर कारवाई ?
प्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत दर्जा वाढवल्यानंतर बोगस ड्रायव्हिंग स्कूलचालक सापडले होते. त्या अनुषंगाने एकावर कारवाईही केली होती. तर, अन्य एकाला सक्त ताकीद दिली होती. मात्र त्यानंतर त्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली नसल्याची दिसून येते. परिणामी, एजंटाच्या माध्यमातून अर्जदारांना फसवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तत्पूर्वी बोगस आणि अवैध्य अशा ड्रायव्हिंग स्कूल चालकांवर कारवाई करण्याची मागणी न्यू पिंपरी-चिंचवड मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशननेही केली होती.
परिवहन कार्यालयाकडून पत्र आल्यानंतर त्यांची तपासणी करुन ग्रेडींग ठरवली जाते. २०२२ मध्ये पत्र आले होते. त्यानुसार सप्टेंबरमध्ये ड्रायव्हिंग स्कूलची तपासणी झाली आहे. दरवर्षी करावेच अशी गरज नाही. तक्रार आल्यानंतर तपासणी केली जाते.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी