संग्रहित छायाचित्र
विधानसभा निवडणुकीत नागरिकांना मतदान करता यावे, त्यांना ओळखपत्राअभावी मतदान करण्यापासून वंचित राहू नये. याकरिता मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ओळखपत्र जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखवल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत २० नोव्हेंबर रोजी २१ मतदारसंघात मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे अशा मतदारांनी मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करावे. तसेच मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार चिठ्ठी आणि मतदार ओळखपत्र नसल्यास वरील १२ पैकी कोणताही एक पुरावा सोबत ठेवावा, असेही निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.
यापैकी एक ग्राह्य धरणार
छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटवण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र (जॉब कार्ड), बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक, श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत दिलेले आरोग्यविमा स्मार्ट कार्ड, वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), स्थायी खाते क्रमांक (पॅन कार्ड), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) यांनी दिलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), छायाचित्र असलेली निवृत्तिवेतनविषयक कागदपत्रे, केंद्र अथवा राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र या १२ पुराव्यांचा समावेश आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.