महापालिका हद्दीत चिखली, कुदळवाडी, तळवडे यासह शहराच्या विविध भागात भंगार, हाॅटेल, वखार यासह विविध दुकाने, आस्थापनांना आग लागण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यावर औद्योगिक आणि व्यावसायिक मिळकतीसंर्दभात अग्निशमन विभागाने सर्वेक्षण करून विविध उपाययोजना सुचवल्या होत्या. मात्र, वारंवार सांगून, नोटीस देवूनही सबंधित आस्थापना मालकांकडून काहीच उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे अग्नी प्रतिबंधक उपाययोजना न करणा-यावर दुकाने जमीनदोस्त होणार, असा सवाल नागरिकांतून होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील शैक्षणिक संस्था, पेट्रोल पंप, दुकाने, गोदाम, व्यापारी आस्थापना, गॅरेज, औद्योगिक व वैद्यकीय आस्थापना, बेकरी, हॉटेल, मल्टिप्लेक्स, वर्कशॉप, छोटे कारखाने आदींचे अग्निसुरक्षा नियमांचे बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने पालिकेने अग्निसुरक्षा पायाभूत सुविधा सर्वेक्षण केले.
अग्निप्रतिबंधक उपाययोजना निष्कर्षांच्या आधारे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने आतापर्यंत एकूण ४२६ व्यावसायिक आस्थापनांना नोटिसा बजावल्या होत्या. आतापर्यंत सर्वेक्षण केलेल्या सुमारे ४३ हजार मालमत्तांपैकी २ हजार ४२३ धोकादायक मालमत्ताची ओळख पटविण्यात आली होती. उर्वरित मालमत्तांच्या अग्निसुरक्षेबाबतच्या पायाभूत सुविधांचे सर्वेक्षण देखील पुर्ण केलेले आहे. व्यावसायिक आस्थापनांमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांचे उल्लंघन झालेले आहे. अनेक गोडाऊनमध्ये ज्वलनशील किंवा जलद गतीने पेट घेणाऱ्या मालाची क्षमतेपेक्षा जास्त साठवणूक करण्यात येत आहे. तसेच मजूरांच्या सुरक्षिततेबाबत व्यावसायिकांनी काळजी घेणे गरजेचे असताना देखील त्यांना पोटमाळ्यावर राहण्याची सोय केली जात आहे.
दरम्यान, महापालिका हद्दीत मागील एक वर्षात २५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात पुर्णानगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा, आकुर्डीत तीन कामगारांचा, तर तळवडेत १६ महिला कामगारांचा मृत्यू झाला होता. या घटना गोदाम, वखार, दुकानांना आग लागून जिवितहानी झालेली आहे. त्यामुळे महापालिकेच्या अग्नीशमन विभागाकडून सर्वेक्षण केले, नोटीस देण्यात आल्या. त्यातील काही दहा ते पंधरा आस्थापना सील केल्या. पण, भंगार, दुकाने, गोडाऊनवर कायमस्वरुपी कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे तेथील रहिवाशी नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कुदळवाडीत गोडाऊनला भीषण आग
पिंपरी-चिंचवडच्या चिखलीमध्ये पुन्हा एकदा गोडाऊनला भीषण आग लागली. घटनास्थळी महापालिकेची नऊ अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहोचली होती. प्रयत्नांची पराकाष्ठा करून आग विझवण्यात आली. काही किलोमीटर अंतरावरून धुरांचे लोट दिसत होते. चिखलीत अनेक अनधिकृत गोडाऊन आहेत.
भंगार व्यावसायिकांवर कारवाई करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. परंतु, चिरीमिरीसाठी महापालिकेचे अधिकारी अनाधिकृत आणि बेकायदेशीर गोडाऊनवर कारवाई करत नसल्याची चर्चा आहे. चिखलीमध्ये नेहमीच आगीच्या घटना घडतात. सोमवारी (दि.९) सकाळी दहाच्या सुमारास चिखली-कुडाळवाडी येथे गोडाऊनला भीषण आग लागली.
चिखलीमध्ये मोठ्या प्रमाणावर भंगार व्यवसाय आणि गोडाऊन असल्याने त्या ठिकाणी नेहमीच आग लागते. यावर महापालिकेने कायमचा तोडगा काढणे देखील गरजेचे आहे. कारण आजूबाजूला नागरी वस्ती आहे. अनेक नागरिक हे चिखली परिसरात राहतात. या आगीच्या धुरापासून त्यांच्या आरोग्याला धोकादेखील उद्भवू शकतो हे नाकारता येत नाही.
४२६ पैकी २६ आस्थापनांवर कारवाई
अग्निप्रतिबंधक उपाय योजना न करणा-या चिखली, कुदळवाडी, तळवडे भागातील 26 मिळकतींना महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून सील केल्या होत्या. या सर्वेक्षणात व्यवसायाच्या ठिकाणी नागरिक वास्तव्य करीत होते. धोकादायक पदार्थांचा साठा केल्याचे दिसून आले होते. भविष्यात दुर्घटना होऊ नये, यासाठी शहरातील औद्योगिक, व्यावसायिक मिळकतीमध्ये अग्निप्रतिबंधक व जीव संरक्षण यंत्रणा आहे की नाही, याबाबत सर्वेक्षण केले.
सर्वेक्षणात त्रुटी आढळलेल्या मालमत्ता, कंपन्यांना दोन वेळा नोटीस देण्यात आल्या. मात्र, त्यानंतरही उपाय योजना न करणाऱ्या केवळ २६ कंपन्यांवर महापालिकेने टाळे ठोकण्याची कारवाई केली. चारशे आस्थापनांवर कारवाई कधी होणार असा सवाल काही दुकानदार, स्थानिक रहिवाशी, पर्यावरणप्रेमी उपस्थितीत करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.