शहराची तहान कशी भागवायची?

पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यात पाण्याची लागणारी गरज ओळखून महापालिकेकडून मुळशी धरणातून पाणी मिळवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. याबाबत महापालिकेने जलसंपदा मुख्य अभियंता, टाटा धरणाच्या व्यवस्थापकांशी पत्रव्यवहार केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 19 Dec 2024
  • 02:49 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यात पाण्याची लागणारी गरज ओळखून महापालिकेकडून मुळशी धरणातून पाणी मिळवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. याबाबत महापालिकेने जलसंपदा मुख्य अभियंता, टाटा  धरणाच्या व्यवस्थापकांशी पत्रव्यवहार केला आहे. परंतू, जलसंपदा मुख्य अभियंता यांच्यासह टाटा धरणाच्या व्यवस्थापनाने राज्य सरकारकडे बोट दाखवत महापालिकेचा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे महापालिकेकडून सुधारित अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करण्यासाठी सर्व्हेक्षण सुरू केले असून लवकरच नवीन प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहर पायाभूत सोयी सुविधांमुळे नागरिकांना आकर्षित करत आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येला पायाभूत सुविधा पुरवतानाच त्यांच्या मुलभूत गरजांची पुर्तता होणे गरजेचे आहे. शहराच्या वाढत्या पाण्याच्या मागणीवरही पालिकेचा पाणी पुरवठा विभाग सातत्याने काम करत आहे. नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, शहरातील पाणी क्षमतेत वाढ होण्यासाठी पाणी पुरवठा विभागाकडून प्रयत्न सुरु आहेत. मनपा हद्दीतील नागरिकांना मुबलक पाणी देण्यास पालिकेचा प्रयत्न असणार आहे. शहराची लोकसंख्या वेगात वाढत आहे. सध्यस्थितीत उपलब्ध असलेले ६१० एमएलडी पाणीही सध्या कमी पडत आहे. येत्या २०३१ पर्यंत शहराची लोकसंख्या सुमारे ४३ लाखांपर्यंत पोहचणार आहे. त्यामुळे पाण्याचे नवे स्त्रोत शोधण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. त्या दृष्टीने मुळशी धरणातील पाणी मिळवण्यासाठी तसेच, इतर नव्या स्त्रोतासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू आहेत.

महापालिकेने मुळशी धरणात ७६० एमएलडी पाणी आरक्षित करण्याची मागणी सात महिन्यांपूर्वी जलसंपदा विभागाकडे केली आहे. मात्र, महापालिकेने दिलेला प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडून फेटाळण्यात आला आहे. तसेच पाणी आरक्षित करण्यासह मंजूरी घेण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा, असे कळवले आहे.

या धरणांवर भागवली जाते शहराची तहान

शहरासाठी पवना धरणातून ५१० एमएलडी, आंद्रा धरणातून १०० एमएलडी आणि भामा आसखेड धरणातून १६७ एमएलडी असे एकूण ७७७ एमएलडी पाणी महापालिकेसाठी आरक्षित आहे. आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. पवना व आंद्रा प्रकल्पाचे पाणी सध्या महापालिका घेत आहे. पवनेतून ५१० एमएलडी आणि आंद्रा प्रकल्पाच्या निघोजे येथील तात्पुरत्या बंधार्‍यातून दररोज ८० एमएलडी पाणी उचलले जात आहे. तर भामा आसखेड धरणातून आणखी १६७ एमएलडी पाणी मिळणार आहे. भविष्यात पाण्याची गरज ओळखून मुळशी धरणातूनही पाणी घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.

भविष्यात दीड हजार एमएलडीची गरज

भविष्यात वाढणार्‍या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. २०४१ च्या संभाव्य ९६ लाख लोकसंख्येसाठी १ हजार ५३६  एमएलडी पाण्याची गरज भासणार आहे. सद्यस्थितीत ७७७ एमएलडी पाणी शहरासाठी आरक्षित आहे. उर्वरित पाण्याची गरज भागवण्यासाठी पाण्याचे नवे स्त्रोत महापालिकेस निर्माण करावे लागणार आहेत. त्यासाठी महापालिकेकडून विविध धरणातून पाणी घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेने मुळशी धरणात ७६० एमएलडी पाणी आरक्षित करण्याची मागणी केली. पण, जलसंपदा विभागाने शासनाकडे संपर्क साधण्यास सांगितले आहे.पवना धरणात ५१० एमएलडी पाणीसाठा आरक्षित आहे. पवना बंद जलवाहिनी प्रकल्प पूर्ण झाल्यास शहरात अधिकचे पाणी मिळू शकेल. तसेच, आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून आरक्षणापेक्षा अधिकचे पाणी उचलण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. तसेच, सांडपाणी पुर्ननिर्माण करून ते बांधकाम, शहरातील उद्योग, उद्यान आणि इतर प्रकल्पासाठी वापरण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा कमी वापर होऊन त्या पाण्याची बचत होणार आहे.

... तर आणखी लोकसंख्या वाढेल

राहण्यायोग्य शहर म्हणून पिंपरी-चिंचवडला देशात पसंती मिळत आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक शहराला कनेक्टिव्ही असल्याने शहराच्या चोहोबाजूंनी टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. हाऊसिंग सोसायट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कंपन्यांच्या जागेवर टोलेजंग इमारती निर्माण होत आहेत. परिणामी, लोकवस्ती वाढून लोकसंख्या वाढत आहे. सध्या शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या आसपास आहे. मागील २५ वर्षांतील लोकसंख्यावाढीचा वेग लक्षात घेता २०३१ मध्ये शहराची लोकसंख्या ५२ लाख ७४ हजार ७८१ होण्याची शक्यता आहेत. तर, २०४१ ला ९६ लाख ३ हजार ८५८ इतकी लोकसंख्या होईल, असा अंदाज आहे. महापालिकेची हद्द वाढणार आहे. त्यानूसार हद्दीलगतचे काही गावे महापालिकेत समाविष्ट होणार आहेत. त्यानुसार हिंजवडी, माण, मारूंजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे ही सात गावे महापालिकेत समाविष्ट केली जाणार आहेत. तसेच, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा भाग, पुणे शहरातील दिघी व कळसचा उर्वरित भाग महापालिकेत समाविष्ट होण्याची करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे भविष्यात पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्येत आणखी मोठी वाढणार आहे.

धरणात ७६० एमएलडी पाणी आरक्षित करण्याची मागणी

शहराची भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन महापालिकेने मुळशी धरणात ७६० एमएलडी पाणी आरक्षित करण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली आहे. त्यातील ९८.५० टक्के पाणी घरगुती पिण्यासाठी वापरले जाईल. तर, १.५० टक्के पाणी औद्योगिक व व्यावसायिक कारणांसाठी वापरले जाईल. तसे पत्र महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंत्यांना डिसेंबर २०२३ मध्ये पाठवले आहे. त्यांनी महापालिकेचा प्रस्ताव फेटाळून लावत त्या संदर्भात राज्य शासनाकडे संपर्क साधण्याबाबत महापालिकेस कळवले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest