संग्रहित छायाचित्र
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिका सेवेतील ‘वर्ग- अ’ ते ‘ड’पर्यंतच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात २०१५ मध्ये धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार पात्र अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या एप्रिल महिन्यात बदल्या करणे अपेक्षित आहे. परंतु, मागील आठ महिने झाले, बदल्यांची फाईल आयुक्त दालनात धूळखात पडून राहिली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या बदली धोरणाला आयुक्तांकडून हरताळ फासला जात असून न्यायालयाचाही अवमान होऊ लागल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील विभाग प्रमुखाच्या मर्जीतील अधिकारी, कर्मचारी हे वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांचे लागेबांधे तयार होऊन अर्थपूर्ण वाटाघाटी वाढू लागल्या आहेत. यामध्ये स्थापत्य, आरोग्य, वैद्यकीय, करसंकलन, भांडार, उद्यान यासह अन्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, महापालिकेचे आयुक्त हे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांकडे दुर्लक्ष करू लागल्याने त्या कर्मचाऱ्यांचे फावले आहे. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी एकाच विभागात ६ वर्षांपासून अधिक काळ कार्यरत आहेत. प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, मुख्य लिपिक, लिपिक, सहायक भांडारपाल, लेखापाल, उपलेखापाल या सारख्या पदांवर अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकारी, कर्मचारी आढळून येत आहेत.
७ ते २० वर्षे एकाच विभागात
अनेक विभागात उपलेखापाल, मुख्य लिपिक, लिपिक, शिपाई, वाहन चालक ७ वर्षांपासून ते १५ वर्षांपर्यंत एकाच विभागात कार्यरत आहेत. त्यापैकी अनेक लिपिक निविदाप्रक्रिया व इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमुळे ठाण मांडून खुर्ची सोडण्यास तयार नाहीत तर, २० वर्षांपासून एकाच शाळेत असणारे शिक्षक, १५ वर्षे एकाच रुग्णालयात असलेले वॉर्डबॉय, १० वर्षे एका विभागात असलेले अनेक शिपाई, २० वर्षे सफाई कामगार, १५ वर्षे आया असे कर्मचारी एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे काम करत असल्याचे आढळून आलेले आहे. त्या अधिकारी-कर्मचा-यांच्या देखील बदल्या त्या-त्या विभागात न करता इतरत्र अन्य विभागात करायला हव्यात.
बदलीचे निकष कोणते?
एकाकी संवर्ग व अन्य विभागांत बदली करता येत नाही, असे ‘अ’ आणि ‘ब’ संवर्गातील अधिकारी व कर्मचारी वगळून ज्यांना एकाच विभागात तीन वर्षे झाली आहेत; ‘क’ संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी एकाच विभागात काम करण्याचा कालावधी सहा वर्षांचा असला, तरी त्यांच्याकडील कामकाज विभागांतर्गत बदलावे, असे बदलीबाबतचे निकष आहेत. वैयक्तिक व वैद्यकीय कारणास्तव बदली हवी असल्यास अर्ज केल्यावर बदली मिळते. महापालिकेच्या आस्थापनेवरील विविध विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या वर्ग एक ते वर्ग चार मधील अधिकारी-कर्मचा-यांची तातडीने बदली करायला हवी. यामध्ये विशेषत: करसंकलन, लेखा, भांडार, स्थापत्य, आरोग्य, वैद्यकीय, आकाशचिन्ह, पर्यावरण या विभागातील अधिकारी-कर्मचा-यांच्या अन्य विभागात बदल्या होणे अपेक्षित आहे.
बदलीचा केवळ फार्स
करसंकलनच्या १७ विभाग कार्यालयातील मुख्य लिपिक, लिपिकांच्या तातडीने अन्य विभागात बदल्या कराव्यात, त्या-त्या झोनच्या कर्मचाऱ्यांविरोधात नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग एक ते वर्ग चार मधील अधिकारी-कर्मचा-यांनी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्यांची तातडीने बदल्या कराव्यात. यावर्षी मात्र डिसेंबर उजाडला तरीही बदल्या करण्याच्या हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे त्यांची बदली आता तरी होईल का, की केवळ बदलीचा फार्स केला जाणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
महापालिकेच्या आस्थापनेवरील काम करणाऱ्या प्रत्येक विभागातून पात्र अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती मागवून बदल्याची फाईल तयार करून ठेवली आहे. पण, लोकसभा, विधानसभा निवडणुकीमुळे बदल्या करता आलेल्या नाहीत. परंतु, बदलीस पात्र अधिकारी-कर्मचाऱ्यांबाबत आयुक्तांकडून निर्णय घेणे आवश्यक आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.
-विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.