अजित गव्हाणे यांच्यासारख्या उमद्या नेतृत्वाला संधी द्या - जयंत पाटील

कोणी दमदाटी, धमकी देत असेल, भीती दाखवत असेल तर त्याला घाबरू नका. तुम्ही काही चिंता करू नका. वीस तारखेचे मतदान आणि 23 नोव्हेंबरची मत मोजणी झाली की हे सगळे गुंड भोसरी सोडून जातील अशी व्यवस्था आम्ही तुम्हाला करून देतो.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 13 Nov 2024
  • 11:08 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मतमोजणी होऊ द्या, भोसरीचे गुंड पळून जातील, गुंडांचा बंदोबस्त चांगलाच जमतो राज्य आम्हीही चालवले- जयंत पाटील

कोणी दमदाटी, धमकी देत असेल, भीती दाखवत असेल तर त्याला घाबरू नका. तुम्ही काही चिंता करू नका. वीस तारखेचे मतदान आणि 23 नोव्हेंबरची मत मोजणी झाली की हे सगळे गुंड भोसरी सोडून जातील अशी व्यवस्था आम्ही तुम्हाला करून देतो. राज्य आम्हीही चालवले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चिखली घरकुल येथे म्हणाले. पिंपरी चिंचवड शहराच्या वाटण्या करून, शहराची वाट लावणाऱ्यांना अद्दल घडवा.अजित गव्हाणे यांच्यासारख्या एका उमद्या नेतृत्वाला संधी द्या असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभेतील अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ चिखली घरकुल येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत होते. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी महापौर आझम पानसरे, माजी आमदार विलास लांडे, गौतम चाबुकस्वार, शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे तसेच माजी नगरसेवक, महाविकास आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. 

जयंत पाटील म्हणाले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या दूरदृष्टीने पिंपरी चिंचवड शहर नावारूपाला आले. शहराचा लौकिक राज्यभर निर्माण झाला.शहर वाढत गेले, शहरातील समस्या देखील वाढत होत्या. मात्र पवार साहेबांच्या दूरदृष्टीने आणि येथील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या कामातून या शहरातल्या समस्या देखील सोडवण्यात आल्या. मात्र गेल्या दहा वर्षात शहराची पुरती वाट लागली आहे. शहराच्या दोन भागात वाटण्या करून या शहराला वाटून खाल्ले आहे. ज्यांना आपण विधानसभेत पाठवले त्यांच्या शरीरात अपप्रवृत्ती शिरली. पैसे कसे मिळवायचे हे त्यांना समजले आणि त्यातूनच शहराचा नावलौकिक मलीन करण्याचे काम केले गेले. 

जयंत पाटील पुढे म्हणाले, महाराष्ट्रात फिरत आहे. महाविकास आघाडीची परिस्थिती खूप चांगली आहे. तुतारीला संपूर्ण राज्यातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघातील तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर उभा असलेल्या उमेदवार अजित गव्हाणे यांच्यासारख्या प्रामाणिक आणि उमद्या व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्राच्या विधिमंडळात पोहोचवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. स्वाभिमानी भोसरीकर हे काम चोखपणे बजावतील असे देखील जयंत पाटील म्हणाले. गेल्या पाच-दहा वर्षात ज्यांनी चोऱ्यामाऱ्या केल्या त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा नाही. त्यामुळे आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर अजित गव्हाणे यांच्यासारखा प्रामाणिक, आणि उमद्या नेतृत्वाला आपल्याला संधी द्यायला हवी.  असे आवाहन देखील जयंत पाटील यांनी केले. 

तुम्ही महाराष्ट्राची अधोगती केली 

गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राचा दरडोई उत्पन्नातील घसरण जयंत पाटील यांनी अधोरेखित केली. गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्रातील दरडोई उत्पन्नाची घसरण सुरू आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर ही वाताहत सुरू झाली. गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यात एकेकाळी स्पर्धा होती. मात्र आता गुजरात आपल्या पुढे निघून गेले आणि महाराष्ट्र अकराव्या क्रमांकावर पोहोचले.  महाराष्ट्रातील विशेषतः पुणे जिल्ह्यातील एअरबस, वेदांता- फॉक्सकॉन असे अनेक उद्योग गुजरातला पळविण्यात आले. महाराष्ट्राची अधोगती करण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केले असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

भाजपात आता 'राम'च राहिलेला नाही

गुजरातचे मांडलिकत्व महाराष्ट्राने स्वीकारल्यासारखे काहीजण वागत आहेत. एकीकडे बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे तर दुसरीकडे भ्रष्टाचाराचा कळस झाला आहे .नांदेडकडे जाणारा जालन्याकडील एक नवा रस्ता केला. त्याचे 11 हजार कोटीचे टेंडर 15 हजार कोटीला दिले. विरारपासून एक नवा रस्ता केला ज्याची कोणीही मागणी केलेली नव्हती . या रस्त्यासाठी 20 हजार कोटीचे टेंडर काढले खर्च मात्र 26 हजार कोटी होत आहे. सरकारी तिजोरीतून पैसे कसे काढायचे असतात हे त्यांच्याकडून शिकले पाहिजे. समृद्धी महामार्ग केला त्याला तडे गेले. मुंबईला जाणारा अटल सेतू केला त्यालाही तडे गेले. एक काम सरळ नाही. तिकडे लोकसभा बांधली गळायला लागली. राम मंदिर बांधले तर यांचा अयोध्येतच पराभव झाला. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षामध्ये रामच राहिलेला नाही असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

दहा वर्ष ज्यांना लोकांनी संधी दिली. त्यांनी त्या संधीचे सोने केले नाही. कदाचित त्यांनी आपले काम प्रामाणिकपणे केले असते तर मी आज उमेदवार म्हणून समोर उभा राहिलो नसतो. त्यांनी आपले स्वप्न भंग केले. भयमुक्त, भ्रष्टाचार मुक्त सत्तेचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात त्यांना भ्रष्टाचाराचा पुरस्कार दिला पाहिजे असे त्यांनी गेल्या दहा वर्षात भ्रष्ट कामगिरीचे रेकॉर्ड मोडले आहे.  गेल्या दहा वर्षातील आपल्या मतदारसंघाची अधोगती लक्षात घ्या. ज्या घरकुल परिसरात आजची सभा होत आहे. त्या नागरिकांना पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन आपल्याच घरात राहण्याची वेळ या सत्ताधाऱ्यांनी आणली. मतदानाला जाताना याच गोष्टीचा विचार करा. येत्या 20 नोव्हेंबर रोजी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबा आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी पुढे या. - अजित गव्हाणे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest