संग्रहित छायाचित्र
महापालिका हद्दीलगत वाकड, हिंजवडी, देहूरोड, मामुर्डी परिसरात तसेच शहराती सर्वच उपनगरात नागरिकांकडून मनाईनंतरही रात्री रस्त्यांवर कचरा a येत असल्याचे निदर्शनास येत आहे. स्थानिक नागरिकांसह फेरीवालेही या कचऱ्यात भर घालत असतात. दिवसा कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईसाठी पालिकेचे पथक फिरत असल्याने नागरिकांकडून आता कचरा टाकण्यासाठी रात्रीचा मुहूर्त साधला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अनेक ठिकाणी रात्री बाहेरील लोक कचरा टाकून निघून जातात. हॉकर्सकडून कचरा टाकून परिसर अस्वच्छ केला जात आहे. भाजीपाला, खाद्यपदार्थ, फळे-फुले विक्रेते व अन्य पथारी व्यावसायिक रात्री घरी जाताना कचरा, उरलेले अन्न-पदार्थ मनपा हद्दीत टाकले जात आहेत. या लोकांना कारवाईसाठी 'ड' क्षेत्रीय कार्यालयाकडून विशेष पथक नियुक्त करुन कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये रात्रीच्या वेळी परिसर अस्वच्छ करणाऱ्या तसेच सार्वजनिक आरोग्यासाठी हानीकारक कृत्य करणाऱ्या नागरिक, अस्थापनांवर कारवाईसाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांतील कारवाईत ६० हजारांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
नगरविकास विभागाकडील शासन निर्णयाअन्वये घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६च्या तरतुदींचे अनुपालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना दंड करण्याचे अधिकार महापालिकांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात आरोग्य विघातक कृत्य करणाऱ्या नागरिकांवर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कारवाई करुन दंड वसुली करण्यात येत आहे.
‘ड’ कार्यालयाच्या विशेष पथकाद्वारे खास करुन रात्रीच्यावेळी मनपा हद्दी बाहेरील हिंजवडी, देहूरोड, मामुर्डी इत्यादी परिसरातून तसेच हॉकर्समार्फत मनपा कार्यक्षेत्रामध्ये कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने, महापालिका हद्दी बाहेरून परिसरात कचरा टाकणाऱ्या नागरिकांना आळा बसत असून शहर स्वच्छ राखण्यास मदत होत आहे. ही मोहिम ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रीय अधिकारी श्रीकांत कोळप, सहायक आरोग्याधिकारी शांताराम माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली जात आहे. या पथकात मनपा आरोग्य कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी काम करत असून त्यांच्यावर आरोग्य निरीक्षक, मुख्य आरोग्य निरीक्षक यांचे नियंत्रण आहे.
महापालिका हद्दीलगतच्या आयटी परिसरातील हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे व अन्य गावांत भाजीपाला, खाद्यपदार्थ, फळे-फुले विक्रेते व अन्य पथारी व्यावसायिक रात्री घरी जाताना कचरा, उरलेले अन्न-पदार्थ मनपा हद्दीत टाकून जातात. मार्केट यार्डला भाजीपाला, फळांची ने-आण करणारे व्यावसायिक पहाटे उरलेला भाजीपाला रस्त्यावरच टाकून अस्वच्छता पसरवतात. अशा सर्वांनी योग्य खबरदारी घेऊन असा कचरा टाकू नये.
- शांताराम माने, साहाय्यक आरोग्य अधिकारी, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.