फ्लेक्स निघाले, रस्ते-चौक होताहेत मोकळे !

लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजताच संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय पक्षांचे बॅनर, फ्लेक्स, बोर्ड काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

फ्लेक्स निघाले, रस्ते-चौक होताहेत मोकळे !

आचारसंहितेचे पालन करण्यासाठी महापालिकेकडून कारवाई, उपनगरांतील काही ठिकाणी राजकीय फ्लेक्स जैसे थे !

विकास शिंदे
लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) बिगूल वाजताच संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय पक्षांचे बॅनर, फ्लेक्स, बोर्ड काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये राजकीय पक्षाच्या १ हजार ८८४ जाहिराती, पोस्टर, बॅनर्स, झेंडे, किऑस्क काढण्यात आले, तसेच राजकीय लोकांचे फलकही झाकण्यात आले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयाेगाने शनिवारी लाेकसभा निवडणुकीची घाेषणा केली आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात आचारसंहिता (Model Code of Conduct) लागू करण्यात आली आहे. देशभरात सात टप्प्यांत मतदान हाेणार असून ४ जूनला निकाल लागणार आहे.  त्या अनुषंगाने महापालिकेच्या (PCMC) आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या तसेच अतिक्रमण विभागाच्या वतीने मावळ व शिरूर लोकसभेच्या हद्दीत असणाऱ्या पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभेत कारवाई करण्यात येत आहे. निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभाग, क्षेत्रीय कार्यालयांच्या वतीने शहरातील राजकीय पक्षांचे बॅनर, फ्लेक्स काढण्यास सुरुवात केली आहे.

राजकीय होर्डिंग्ज मात्र तसेच

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेबाबत आदेश धडकल्यानंतरही पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे असणारे होर्डिंग्ज काढण्याबाबत प्रशासनाकडून हालचाली सुरू केल्या आहेत. शहरातील मुख्य चौकातील फ्लेक्स काढण्यात आले. मात्र, उपनगरांतील रस्त्यावर चौकांमध्ये राजकीय पक्षांचे होर्डिंग्ज 'जैसे थे'च होते.

परवाना निरीक्षक आणि अतिक्रमण विभागाचे निरीक्षक यांना समन्वयाने काम करून राजकीय बॅनरवर कारवाई करावी. तसेच राजकीय नेत्यांनी आचारसंहिता कालावधीत निवडणूक विभागाची परवानगी घेऊनच फ्लेक्स लावावेत, अन्यथा अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येईल.

- संदीप खोत, उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग, महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest