संग्रहित छायाचित्र
विधानसभा निवडणूक कामासाठी महापालिकेच्या तब्बल ५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना नेमले आहे. अधिकारी व कर्मचारी हे इलेक्शन ड्यूटीत व्यस्त असल्याने महापालिका व क्षेत्रीय कार्यालये ओस पडली असून, दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या कामाचा खोळंबा होत असल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी पुणे विभागीय कार्यालयाने निवडणूक कामासाठी महापालिकेच्या संभाव्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या याद्या तयार केल्या होत्या. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तत्काळ संबंधितांना कामकाजाच्या ठिकाणी नेमणूक देण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासोबत साहाय्यक निवडणूक अधिकारी, झोनल ऑफिसर व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात काही अधिकारी व कर्मचारी तैनात आहेत. मतदान केंद्रावर लागणाऱ्या साहित्याची तयारी सुरू आहे. ईव्हीएम, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट मशिनची ने-आण देखभाल तसेच, विविध पथके तसेच, कामकाजासाठी कर्मचारी नेमले आहेत. मतदान यंत्राच्या तपासणी आणि प्रशिक्षणाचे कामकाज सुरू आहे.
पालिका भवन आणि क्षेत्रीय कार्यालये ओस
आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रभावित करणाऱ्या अनेक योजना थांबवण्यात आल्या आहेत. तसेच, बहुतांश अधिकारी व कर्मचारी इलेक्शन ड्यूटीला असल्याने कामकाज जवळजवळ ठप्प आहे. इलेक्शन ड्यूटीमुळे त्या कर्मचाऱ्यांना महापालिका कामकाजातून तसेच, थॅम्ब इप्रेशनमधून सूट देण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थित नसल्याने महापालिका भवन आणि क्षेत्रीय कार्यालये ओस पडली आहेत.
इलेक्शननंतर कामकाज सुरळीत
महापालिकेच्या संबंधित कामासाठी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक, पदाधिकारी हे महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांस फोन करून संपर्क साधतात. आता त्यांना संपर्क केला असता इलेक्शन ड्यूटीला आहे, असे उत्तर दिले जाते. काही जण फोन उचलताच, एसएमएस करून इलेक्शन ड्यूटी असल्याचे सांगून मोकळे होतात. त्यामुळे कामासाठी कोणाला संपर्क साधायचा, असे प्रश्न नागरिकांसह पदाधिकाऱ्यांना पडला आहे. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागल्यानंतर आचारसंहिता शिथिल होणार आहे. त्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचारी इलेक्शन ड्यूटीतून मुक्त होणार आहेत. त्यानंतर महापालिकेचे कामकाज सुरळीत सुरू होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
पाच हजार अधिकारी-कर्मचारी इलेक्शनसाठी
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा निवडणूक कामकाजासाठी महापालिकेचे तब्बल ५ हजार १७७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये वर्ग दोन व तीनचे २ हजार ३५२, वर्ग चारचे १ हजार ६१० कर्मचारी, पीआरओ, एफपीओ, ओपीओ, बीएलओ, झेडओ, एमओ आदींसाठी १ हजार २१५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी १ हजार १४० अधिकारी व कर्मचारी, पिंपरी मतदारसंघासाठी १ हजार ४१९ अधिकारी व कर्मचारी आणि भोसरी मतदारसंघासाठी १ हजार ८ कर्मचारी नेमण्यात आले आहेत.