अखेर न्यायालयात ई फायलिंग सुविधा केंद्र सुरू
पिंपरी न्यायालयात ई फायलिंग सुविधा केंद्र, मेडिएशन सेंटर व उपाहारगृहाची सुविधा नुकतीच सुरू करण्यात आली. याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नुकताच पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामाने पार पडला.
पिंपरीतील नेहरुनगर न्यायालयात या सुविधा सुरू करण्याबाबत ‘सीविक मिरर’ ने नुकतेच वृत्त दिले होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन, पिंपरी-चिंचवडचे प्रमुख दिवाणी न्यायाधीश राजेश वानखेडे, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव सोनल पाटील, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप, सदस्य ॲड. अहमद पठाण, पुणे जिल्हा ई फाइलिंग प्रमुख ॲड. पृथ्वीराज थोरात, नेहरुनगर न्यायालयातील न्यायाधीश एन. आर. गजभिये, आर. एम. गिरी, बी. डी. चौखंट, कमी एम. जी. मोरे, पी. सी. फटाले, ए. एम. बगे, एम. ए. आवळे, व्ही. एन. गायकवाड, ॲड. अतिश लांडगे, ॲड. सुदाम साने आदी उपस्थित होते.
न्यायालयाचे कामकाज स्मार्ट पद्धतीने करण्यासाठी ई फायलिंग ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. वकील आणि पक्षकारांना ऑनलाईन माध्यमातून सर्व दावे दाखल करता येतील. वकील व पक्षकारांना मदत मिळण्यासाठी ई फायलिंग सुविधा केंद्राची मदत होणार आहे. गेल्या वर्षी न्यायालयाचे मोरवाडी येथून नेहरुनगरला स्थलांतर झाले आहे. तेथे उपाहारगृह अद्याप सुरू नव्हते.
या सुविधांचा वापर पक्षकारांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्याचप्रमाणे न्यायालयाचादेखील वेळ वाचणार आहे. या सुविधेचा वकिलांसोबत पक्षकारांनीही वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या नेहरुनगर न्यायालयात सुरू असलेल्या इमारतीमध्ये नेमके कोणते कोर्ट कुठे सुरू आहे, याची माहिती होत नाही. त्यामुळे या केंद्राचा उपयोग सर्वांना होणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.