संग्रहित छायाचित्र
महापालिकेच्या अत्यावश्यक विभागासह सर्वच विभागांची अधिकारी व कर्मचार्यांना पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभेच्या निवडणूक कामकाजासाठी नेमण्यात आले आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्याने महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. महापालिकेच्या अत्यावश्यक विभागातील कर्मचार्यांना तरी निवडणूक कामकाजातून वगळावे, असे विनंतीवजा पत्र महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता मंगळवार (दि.१५) पासून लागू झाली आहे. शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे तीन विधानसभा क्षेत्र आहेत. त्या मतदारसंघाच्या निवडणूक कामकाजासाठी महापालिकेच्या बहुतांश विभागांच्या अधिकारी कर्मचारी तसेच, शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यातून अत्यावश्यक सेवेतील पाणीपुरवठा, अग्निशमन, ड्रेनेज, आरोग्य, विद्युत या विभागांतील अधिकारी व कर्मचारीही सुटलेले नाहीत. नेमलेल्या मतदार संघाच्या कामासाठी हजर न झाल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. सर्वच अधिकारी व कर्मचारी इलेक्शन ड्युटीत व्यस्त असल्याने महापालिका व क्षेत्रीय कार्यालये ओस पडली आहेत. त्यामुळे महापालिकेचे दैनंदिन कामकाज जवळजवळ ठप्प झाले आहे. आचासंहिता संपेपर्यंत म्हणजे २३ नोव्हेंबरपर्यंत अशीच स्थिती राहणार असल्याने सर्वच कामे जवळजवळ दीड महिना खोळंबून राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इलेक्शन ड्युटीतून पाणीपुरवठा, आरोग्य, अग्निशमन, ड्रेनेज, कर संकलन या अत्यावश्यक विभागातील अधिकारी व कर्मचार्यांना वगळावे, अशी विनंतीवजा पत्र आयुक्त सिंह यांनी जिल्हाधिकार्यांना पाठवले आहेत. आयुक्तांच्या पत्राला निवडणूक विभाग कितपत प्रतिसाद देतो, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
महापालिकेची वाहनेही काढून घेतली
विधानसभानिहाय निवडणूक कामकाजासाठी विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्या पथकांना वाहने दिले जाते. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची वाहने निवडणूक विभागाकडून ताब्यात घेण्यात येत आहेत. मुदतीमध्ये संबंधित वाहने महापालिकेने निवडणूक विभागाकडे जमा न केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.