संग्रहित छायाचित्र
थंडीचा हंगाम सुरू झाला आहे. कचरा जाळणे व शेकोटी पेटविण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यांच्यावर कारवाई करा. रस्ते नियमितपणे स्वच्छ करा. आवश्यक ठिकाणी रस्ते धुवून घ्या. खराब रस्ते दुरूस्त करा. शहरातील वाढलेले हवा प्रदूषण कमी करा, असे आदेश महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्व क्षेत्रीय अधिकार्यांना दिले आहेत.
शहरातील थेरगाव, वाकड, काळा खडक, भुमकर वस्ती या भागांत हवेतील प्रदूषण वाढल्याचे दिसत आहे. एअर कॉलिटी इंडेक्स अतिधोकादायक स्थितीत गेला आहे. त्याची दखल घेऊन आयुक्त सिंह यांनी तातडीने बैठक घेतली. या वेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकात इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर, सर्व आठ क्षेत्रीय अधिकारी, पर्यावरण, ड्रेनेज, स्थापत्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळीच्या शुद्ध हवेतही आहे प्रदूषण
शहरातील काही भागात प्रदूषणामुळे पिंपरी-चिंचवडची हवा खराब श्रेणीत गेल्याचे दिसून येत आहे. भोसरी, थेरगाव, पिंपरीसारख्या भागात सकाळी हवा गुणवत्ता निर्देशांक
२००-२५० पेक्षा अधिक नोंदविला जात आहे. मात्र, हवा शुध्द करण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असतात. त्या यंत्रणादेखील फोल ठरू लागल्याचे दिसून येत आहे.
हवा गुणवत्ता निर्देशांक ५० पर्यंत असणे आवश्यक आहे. त्यापेक्षा अधिक प्रदूषण वाढल्यास त्याचे आरोग्यावर परिणाम होतात. शहरातील काही भागात मागील काही दिवसांत सकाळी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३०० च्या पुढे नोंदवला गेला. यामध्ये भोसरीतील इंद्रायणीनगर येथे ३००, मोशी परिसरात ३२५, चिखली परिसरात ३६० आणि भोसरी ते हिंजवडी परिसरात ३०० च्या पुढे नोंदविली गेली आहे.
श्वसन विकारांच्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ
महापालिकेच्या पर्यावरण अहवालात सलग दोन वर्षांच्या आकडेवारीवरून शहरात प्रदूषणामुळे श्वसनाच्या रुग्णसंख्येत सतत भर पडत असल्याचे दिसून येते. २०२१-२२ मध्ये १ हजार ३०९ इतके श्वसन विकाराचे रुग्ण होते तर २०२२-२३ मध्ये ही रुग्ण संख्या २ हजार ३२१ पर्यंत पोहोचली. यामध्ये आता नोव्हेंबर २०२४ अखेरपर्यंत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
एअर क्वालिटी इंडेक्स हे हवेची गुणवत्ता तपासण्याचे एक पॅरामीटर आहे. यामध्ये धुलीकण, कार्बन मोनाक्साईड, सल्फरडाय ऑक्साईड, लिड, जमिनीवरचे ओझोन हे सर्व मोजले जातात. हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) हा ० ते ५० पाहिजे. दिवाळीच्या वेळी हा ७०० च्या पुढे होता. नोव्हेंबर महिन्यात आम्ही आता रीडिंग घेतल्यावरदेखील तो ३०० च्या पुढे आहे.
शहराच्या आरोग्यावर परिणाम
शहराची हवा शहरवासीयांच्या आरोग्यावर परिणामकारक ठरत आहे. त्यातून श्वसनविकाराचा धोका वाढत आहे. तसेच, अस्थमा, सीओपीडी, इतर फुप्फुसांच्या विकार असलेल्या रुग्णांना याचा मोठा त्रास होतो. पर्यावरण प्रेमींकडून हवा प्रदूषण कमी करण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरत असून केलेल्या उपाययोजना नावालाच असल्याचा आरोप होत आहे.
आयुक्तांच्या आदेशानुसार पर्यावरण तसेच, आरोग्य विभागाचे पथकांकडून कारवाई सुरू झाली आहे. शहरात फॉगींगचे प्रमाण वाढविण्यात आले आहेत. धुळीने माखलेले रस्ते धुवून घेण्यात येत आहेत. रस्ते स्वच्छ करून घेण्यात येत आहेत. कचरा जाळणारे व शेकोटी पेटविणार्यांवर महापालिकेच्या पथकाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वाकड, थेरगाव भागांतील हवेतील प्रदूषण कमी झाले आहे. तेथील एअर कॉलिटी इंडेक्स नियंत्रणात आले आहे, असे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.
आता पिंपरी चिंचवडचा विचार करता खराब रस्ते, बांधकाम, औद्योगिक आणि शहरी कचरा जाळण्याचे प्रकार व त्यातच कमी झालेले हरित क्षेत्र व ढासळलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पिंपरी चिंचवडकरांचा श्वास कोंडत आहे. हिवाळा सुरू झाल्याने थंडी वाढू लागली आहे. शहरावर धुक्याची दाट झालर पसरली जात आहे.
शहरात थंडी वाढल्याने शेकोटी पेटविली जात आहे. तसेच, काही ठिकाणी कचरा जाळला जात आहे. त्यामुळे वायू प्रदूषण वाढत आहे. तसेच, रस्ते स्वच्छ न केल्याने तसेच, नादुरूस्त व खड्डेमय रस्त्यांमुळे
धूळ उडून हवेत धुळीचे प्रमाण वाढत आहे. शेकोटी पेटविणारे व कचरा जाळणार्यांवर कारवाई करा. धुळमय रस्ते स्वच्छ करून धुवून घ्या. खराब रस्ते दुरूस्त करून घ्या. हवेत धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी फॉगींगचे प्रमाण वाढावा. चौका चौकांतील फॉगींग नियमितपणे होत असल्याचे खात्री करा. बांधकाम प्रकल्पातून धुळीचे प्रमाण वाढत असल्यास त्यावर कारवाई करा. तातडीने उपाययोजना करा.
- शेखर सिंह, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.