संग्रहित छायाचित्र
पीएमआरडीएच्या विकास परवानगी विभागामध्ये विविध कारणांनी नागरिकांची गर्दी असते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून गर्दी होत आहे ती अधिकाऱ्यांना खास भेटण्यासाठी. बांधकाम नोंदणी सोबतच, विविध प्रकरणासाठी अनेक बांधकाम व्यावसायिक, एजंट, आर्किटेक्ट यांची ये-जा सुरू असते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची संख्या अधिकच वाढत असून, येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या हातामध्ये जड बॅग दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी वेटिंगवर देखील थांबावे लागत आहे. त्यामुळे यंदा अधिकाऱ्यांची दिवाळी जोरात होणार असे दिसून येत आहे. एकीकडे महापालिकेने भेटवस्तू घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला असून, पीएमआरडीएच्या कार्यालयात खुलेआम भेटवस्तू देण्यात येत आहेत.
प्राधिकरणाची हद्द जवळपास साडेआठशे गावांची आहे. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहराचा देखील समावेश होतो. त्यामुळे नामवंत बांधकाम व्यावसायिक अनेक नोंदणी, प्रकल्प अधिकाऱ्यांकडून मंजूर करून घेण्यात आले. त्यामुळे आता दिवाळीच्या तोंडावर त्यांना खुश करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांची लगबग दिसून येत आहे. या कार्यालयात आल्यानंतर प्रथम अधिकाऱ्यांना फोन होतो त्यानंतर संबंधित कर्मचारी त्यांच्याकडून ती भेटवस्तू घेऊन जातो. तर, काही अधिकाऱ्यांच्या टेबलावरती भेटवस्तू पोहोचवली जाते.
सामान्य नागरिकांना अनेकदा हेलपाटे मारून त्यांची कामे होत नाहीत. दुसरीकडे अशाप्रकारे बांधकाम व्यावसायिकांच्या अर्थपूर्ण संबंधांमुळे त्यांची कामे पटापट होतात. प्राधिकरणातील या विभागात सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. इतर मात्र प्रशासन, अतिक्रमण व निर्मूलन, नियोजन, त्याचप्रमाणे अभियांत्रिक विभागात देखील शुकशुकाट होता. अनेक अधिकारी व्हीजिटच्या नावाखाली जागेवर नव्हते. तर, काही अधिकारी निवडणूक गुंतल्याने तिथपर्यंत नागरिक पोचू शकले नाहीत.
राजकीय पदाधिकाऱ्यांच्याही शुभेच्छा
विकास परवानगी विभाग हा महत्त्वाचा आहे. बांधकामासाठी मंजुरी आणि कागदपत्राची पडताळणी या विभागात होते. त्यामुळे प्राधिकरणात येणाऱ्या नागरिकांपैकी बहुतांश नागरिक या कार्यालयात येत असतात. त्यामुळे हा विभाग गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेला जात आहे. बांधकाम व्यावसायिकांबरोबरच राजकीय पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात शुभेच्छा मिळत आहेत. एका सत्ताधारी राजकीय पक्षाच्या माध्यमातून कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये थेट एन्ट्री देण्यात आली.
विभागातील दरवाजाचे लॉक काढले
विकास परवानगी विभागामध्ये नागरिकांनी कधीही प्रवेश करू नये यासाठी प्रवेशद्वारापाशी लॉक लावण्यात आले आहे. केवळ कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनाच ते खुले करण्यात येते. अन्यथा सामान्य नागरिकांना आतमध्ये सोडता येत नाही. त्यासाठी तब्बल दोन कर्मचारी येथे करण्यात असतात. मात्र दिवाळीच्या निमित्ताने सर्व नागरिकांना हा दरवाजा उघडा होता. त्याचे लॉक काढण्यात आले होते.