भेटवस्तू स्वीकारल्यास शिस्तभंगाची कारवाई - आयुक्त

दिवाळीला महापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेटवस्तू वाटपास आयुक्त शेखर सिंह यांनी मनाई केली आहे. तसेच, जे अधिकारी व कर्मचारी भेटवस्तू घेताना आढळतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 25 Oct 2024
  • 12:41 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

दिवाळीला महापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेटवस्तू वाटपास आयुक्त शेखर सिंह यांनी मनाई केली आहे.  तसेच, जे अधिकारी व कर्मचारी भेटवस्तू घेताना आढळतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे.

आयुक्त सिंह यांनी भेटवस्तू स्वीकारणेच्या प्रथेला चाप बसविण्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा नियमाचा आधार घेत मंगळवारी (दि. १३) एक परिपत्रक जारी केले आहे. परिपत्रकात म्हटले आहे की, प्रभावी आणि लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेसाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे हे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे. 

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील कलम १२ नुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने कोणतीही देणगी (भेटवस्तू) स्वतः स्वीकारता कामा नये अथवा त्याच्या कोणत्याही कुटुंबीयाला किंवा त्याच्या वतीने काम करणाऱ्या व्यक्तीला भेटवस्तू स्वीकारण्यास परवानगी देता कामा नये.

या संदर्भात सुरक्षा विभागाने अशा भेटवस्तू घेऊन येणाऱ्यास कार्यालयात मज्जाव करावा, अशा प्रकारच्या भेटवस्तू महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वीकारल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची कडक कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी नमूद केले आहे.

Share this story