इंद्रायणीच्या नदीपात्रात मृत माशांचा पडला खच
विकास शिंदे
तीर्थक्षेत्र देहू येथील इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात वाढ होऊन पाण्यातील आॅक्सिजन पातळी कमी झाल्याने बुधवारी (१३ मार्च) शेकडो मासे मृतावस्थेत आढळून आले. या मृत माशांमध्ये गोल्डन, महाशिर, शिवडा यासह विविध प्रजातींचा समावेश असून त्यात काही माशांची लांबी साडेतीन फूट असल्याचे आढळून आले आहे.
देहू गावात संत तुकाराम महाराज मंदिर आहे. त्यामुळे या गावाला तीर्थक्षेत्राचा बहुमान मिळाला. दरवर्षी लाखो भाविक भक्त देहूगावात संत तुकाराम महाराजांच्या दर्शनाला येतात. दर्शन घेण्यापूर्वी इंद्रायणी नदीत अंघोळ करतात. तसेच या नदीचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. मात्र हे पाणी अत्यंत दूषित झाले आहे. यामुळे जलचरांसह भाविक भक्तांच्या देखील आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
देहूगाव येथील इंद्रायणी नदीपात्रात अचानक शेकडो मृत मासे पाण्यावर तरंगू लागले होते. तेथील नागरिक सकाळी फिरायला गेल्यानंतर त्यांनी पात्राजवळ जाऊन पाहिले तर मृत माशांचा खच आढळून आला. नागरिकांनी सर्व मासे पाण्यातून बाहेर काढले. इंद्रायणी नदीत यापूर्वी वाम, मरळ, चीलापी असे मृत मासे आढळून आले होते. इंद्रायणी नदीपात्रात ठिकठिकाणी जलपर्णी वाढली आहे. तिथे माशांना पाण्याच्या वरच्या भागात येता येत नाही. त्यामुळे मासे जलपर्णी कमी असलेल्या कापूरवडा परिसरात आले होते. मात्र ओढ्यातून शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात असल्याने पाणी अत्यंत प्रदूषित झालेले आहे. इंद्रायणी नदीच्या पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी झाले आहे.
देहूगावातील सांडपाणीदेखील सरळ नदीपात्रात सोडले जात आहे. यामुळे नदीपात्रातील पाणी अत्यंत दूषित झाले आहे. पाण्यावर मोठ्या प्रमाणात जलपर्णीचे साम्राज्य वाढले आहे. नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. यातूनच नदीतील माशांचा मृत्यू होऊ लागला आहे. नदीपात्रातून बाहेर काढलेल्या मृत माशांचा खच पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी केली होती. मात्र, नदी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळ (एमपीसीबी) ठोस पाऊले उचलत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
दरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी आरती डोळस आणि देहू नगर पंचायतीच्या मुख्याध्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी घटनास्थळी भेट दिली. माशांच्या मृत्यूची कारणे शोधण्यासाठी पाण्याचे नमुने घेतले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाण्याचे नमुने देण्यात येणार असल्याचे डोळस यांनी सांगितले.
इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. शहरासह अनेक ग्रामीण भागातील सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. जलपर्णी वाढली आहे. त्यामुळे जलचरांना आपला जीव गमवावा लागत आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.
-सोमनाथ मुसडगे, सामाजिक कार्यकर्ते
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.